जो रूट (Photo Credit: Twitter/englandcricket)

ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील प्रतिष्ठित अ‍ॅशेस मालिकेच्या (Ashes Series) तिसऱ्या, बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test), सामन्याची आजपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर (Melbourne Cricket Ground) सुरुवात झाली आहे. सामन्याच्या सुरुवातीला ब्रिटिश कर्णधार जो रूटने (Joe Root) टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रूटचा निर्णय संघातील खेळाडू बॅटने योग्य सिद्ध करू शकले नाही आणि पहिल्याच दिवशी अवघ्या 185 धावांवर ढेर झाले. पण रूट एकाबाजूने तळ ठोकून फलंदाजी करत राहिला आणि धमाकेदार अर्धशतक ठोकले. कर्णधार जो रूट संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असून त्याने शानदार अर्धशतक झळकावले. रूटने सलग तिसऱ्या कसोटी सामन्यात आपले अर्धशतक पूर्ण केले, जे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 53 वे अर्धशतक आहे. या खेळीदरम्यान रुटने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथचा (Graeme Smith) मोठा विक्रम मोडीत काढला आहे. (Ashes 2021-22: तिसऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाकडून प्लेइंग XI मध्ये बदल, स्कॉट बोलैंड करणार डेब्यू)

रूटने कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम केला. त्याने 2021 मध्ये आतापर्यंत 1680 धावा केल्या आणि 2008 मध्ये ग्रॅमी स्मिथच्या 1656 धावांचा विक्रमाच्या पुढे गेला. दरम्यान एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावांचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफच्या नावावर आहे ज्याने 2006 मध्ये 11 सामन्यात 1788 धावा केल्या होत्या. त्याच्यापाठोपाठ वेस्ट इंडिजचे महान विवियन रिचर्ड्स आहेत, ज्यांनी 1976 मध्ये 11 कसोटी सामन्यांमध्ये 1710 धावा केल्या होत्या. माइकल क्लार्कने 2012 मध्ये कर्णधार म्हणून 1595 धावा केल्या होत्या. यांच्याशिवाय भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने 2018 मध्ये 13 कसोटी सामन्यांमध्ये 1322 धावा केल्या. तसेच 2016 मध्येही त्याने 18 डावात 1215 धावा केल्या होत्या. मात्र, कर्णधार म्हणून कोहली जो रूटच्या खूप मागे आहे.

दरम्यान, दुर्दैवाने गेल्या 5 सामन्यांमध्ये रूटला शतक झळकावण्यात अपयश आले आहे. रूट आतापर्यंत डाऊन अंडर एकही कसोटी शतक करू शकलेला नाही. जो रूटने अर्धशतक ठोकून इंग्लंडला सुरुवातीच्या झटक्यांमधून सावरले. दिवसाच्या सुरुवातीच्या सत्राच्या शेवटच्या चेंडूवर डेविड मलान बाद होण्यापूर्वी दोघांमध्ये 48 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. त्याला आता विव रिचर्ड्स यांना मागे टाकण्यासाठी 31 धावांची आणि पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफचा सर्वकालीन विक्रम मोडण्यासाठी 109 धावांची गरज आहे. तर, सामन्याच्या दुसऱ्या डावात शंभरी धावसंख्या करताच रूट रिचर्ड्सच्या एका कॅलेंडर वर्षात 7 शतकांच्या विक्रमाची बरोबरी देखील करू शकतो.