IND vs AUS: ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजयानंतर Ajinkya Rahane याचे मनोबल उंचावणारे शब्द ऐकून तुम्हालाही वाटेल कॅप्टन असावा तर असा! (Watch Video)
अजिंक्य रहाणेचे ड्रेसिंग रूममधील भावनिक भाषण (Photo Credit: Twitter/BCCI)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) नुकत्याच संपुष्टात आलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी सामन्यात यजमान संघाचा 2-1 असा पराभव केल्यावर भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) ड्रेसिंग रूममध्ये भावनिक स्पीच दिली ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये (Brisbane Test) कांगारू संघावर मात करत रहाणे ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील कसोटी मालिकेत विजय मिळवणारा विराट कोहलीनंतर दुसरा आशियाई कर्णधार ठरला. ऐतिहासिक मालिकेतील विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये आपल्या सहकाऱ्यांशी रहाणेच्या संभाषणाचा व्हिडिओ बीसीसीआयने शनिवारी शेअर केला. अ‍ॅडिलेड येथील लज्जास्पद पराभवानंतर कमबॅक करत 2-1 ने विजय मिळवल्याबद्दल संघावर कौतुकाचा वर्षाव केला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकही सामना न खेळलेल्या कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्यासाठीही रहाणेने खास संदेश देत गोलंदाजाचे मनोबल वाढवले. तुझीही वेळ येईल, फक्त परिश्रम करत रहा असे कुलदीपला उद्देशून रहाणेला बोलताना ऐकले जाऊ शकते. (Rahane Wins Heart Again: ऑस्ट्रेलियानंतर अजिंक्य रहाणेने जिंकली भारतीय चाहत्यांची मनं, सेलिब्रेशनसाठी आणलेला केक कापण्यास या कारणाने दिला नकार)

“आपल्या सर्वांसाठी हा एक मोठा क्षण आहे. अ‍ॅडलेडमध्ये काय घडले, आपण मेलबर्नमध्ये कसे कमबॅक केलं ते पाहणे खरोखर चांगले आहे. प्रत्येकाने प्रयत्न केले, प्रत्येकाने योगदान दिले, हे एक किंवा दोन व्यक्तींपैकी नव्हते. यावेळी मी कुलदीप यादव आणि कार्तिक त्यागीचे नाव घेईन. कुलदीप, मला माहित आहे की तुझ्यासाठी हे खूप कठीण होते, तुला इथे एकही मॅच खेळायला मिळाली नाही पण तुझी वृत्ती खरोखर चांगली होती. तुझी वेळ येईल आणि कार्तिक असाधारण आहेस,” रहाणेने आपल्या भावनिक संदेशात म्हटले. अ‍ॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला होता. सामन्याच्या दुसर्‍या डावात टीम इंडिया 36 धावांवर ढेर झाली, जे कसोटीतील त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे.

पहिल्या टेस्ट सामन्यानंतर विराट कोहली पितृत्व रजेसाठी मायदेशी परतल्यावर रहाणेने कर्णधारपद सांभाळले. रहाणेच्या शतकी खेळीच्या जोरावर संघाने मेलबर्नमध्ये दुसऱ्या सामन्यात 8 विकेटने विजय मिळवत सामन्यात बरोबरी केली, त्यानंतर सिडनी येथील तिसरा सामना अनिर्णीत राहिला होता.