कसोटीत 14 दिग्गज फलंदाजांनी गाठला 10 हजार धावांचा टप्पा, यादीत भारताच्या तीन दिग्गजांचा समावेश; वाचा सविस्तर
सचिन तेंडुलकर (Photo Credits: Getty Images)

Test Cricket Records: 1987 साली प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाने 10 हजार धावांचा विक्रमी पल्ला गाठला. हा ऐतिहासिक विक्रम भारताचे माजी दिग्गज सलामीवीर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या नावावर आहे. ‘लिटिल मास्टर’ म्हणून प्रसिद्ध सुनील गावसकर यांच्या आधी हा जादुई आकडा गाठणे प्रत्येक फलंदाजासाठी स्वप्नासारखे होते. नुकतेच सुनील गावसकर यांनीही पहिल्यांदाच एव्हरेस्टवर चढाई केल्यासारखे हा आकडा गाठल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांच्यानंतर 35 वर्षात आणखी 13 फलंदाजांनी हा मोठा आकडा गाठण्याचे धैर्य एकवटले. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) आतापर्यंत एकूण 14 फलंदाजांनी 10 हजार धावा केल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून सर्वाधिक फलंदाजांनी 10 हजार धावा केल्या. या दोन्ही संघातील 3-3 खेळाडूंनी हा आकडा पार केला. इंग्लंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजकडून प्रत्येकी 2-2 आणि दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी एका खेळाडूने हा आकडा गाठला. कोण आहेत हे, पहा इथे... (ENG vs NZ: जो रूट मोडणार सचिन तेंडुलकरचा सार्वकालीन विक्रम, लॉर्ड्सवर मॅच-विनिंग खेळीनंतर दिग्गज खेळाडूचे भाकीत)

कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांच्या फलंदाजांच्या यादीकडे पहिले तर आतापर्यंत या एलिट लिस्टमध्ये भारताच्या चार दिग्गज फलंदाजांनी स्थान मिळवले आहे. तसेच क्रिकेटचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या इंग्लंडचे दोनच फलंदाज हा आकडा पार करू शकले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ‘क्रिकेटचा देव’ आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने 200 कसोटी सामन्यात एकूण 15,921 धावांचा डोंगर उभारला आहे. सचिन वगळता ‘द वॉल’ राहुल द्रविड आणि गावस्कर यांचा समावेश आहे. दुसरीकडे, इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये हा मैलाचा दगड गाठणारा सर अॅलिस्टर कूक पहिले फलंदाज आहे. कूकने ब्रिटिश संघाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सार्वधिक 12,472 धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार जो रूट या एलिट यादीत सामील होणार नवा फलंदाज आहे. रूटने नुकतंच न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यात शंभरी धावसंख्येसह विक्रमी पल्ला गाठला.

कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर: 15921 (भारत)

रिकी पाँटिंग: 13378 (ऑस्ट्रेलिया)

जॅक कॅलिस: 13289 (दक्षिण आफ्रिका)

राहुल द्रविड: 13288 (भारत)

अॅलिस्टर कुक: 12472 (इंग्लंड)

कुमार संगकारा: 12400 (श्रीलंका)

ब्रायन लारा: 11953 (वेस्ट इंडिज)

शिवनारायण चंद्रपॉल: 11867 (वेस्ट इंडिज)

महेला जयवर्धने: 11814 (श्रीलंका)

अॅलन बॉर्डर: 11174 (ऑस्ट्रेलिया)

स्टीव्ह वॉ: 10927 (ऑस्ट्रेलिया)

सुनील गावस्कर: 10122 (भारत)

युनूस खान: 10099 (पाकिस्तान)

जो रूट: 10015 (इंग्लंड)