रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

भारतीय सलामीवीर रोहित शर्मा कसोटी सामन्यांसाठी सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडबरोबर कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होईल. यावरूनच माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने रोहित शर्माच्या कर्णधार पदाबाबत धक्कादायक विधान केले आहे. रोहित शर्मामध्ये एमएस धोनीची झलक दिसू शकते असे आकाशने म्हटले आहे. तसेच काही ठिकाणी तो अगदीच धोनीसारखाच कर्णधार वाटतो.

रोहित शर्माच्या मनात सर्व प्रकारच्या योजना चालू असतात. असे वक्तव्य आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूनब चॅनलवरील व्हीडिओमध्ये केले आहे. धोनी जसा मनात विचार करायचा तसाच विचार रोहितही करतो. त्यामुळे त्याच्या मनातले कळणेही अवघडच आहे. सतत एक वेगळ्या प्रकारचे गणित त्याच्या मनात चालू असते. कोणत्या गोलंदाजाकडे किती षटके शिल्लक आहेत. तसेच कोणत्या गोलंदाजाला कधी गोलंदाजी करावी लागेल. याचा पुर्ण विचार रोहित करत असतो. त्याचे खेळावर चांगले नियंत्रण असते.

आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार रोहित शर्मा असा कर्णधार आहे जो खेळाडूंना स्वतःचे निर्णय घेऊ देतो. तो एखादया खेळाडूला सल्ला देण्याचे काम करतो. मात्र पुढे काय करायचं हे त्या खेळाडूवर सोडून देतो. धोनीदेखील असेच काहीसे करायचा. रोहित हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे मतही त्याने व्यक्त केले. आयपीएल कर्णधारांच्या विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत रोहित अव्वल स्थानी आहे.

रोहितच्या नेतृत्वात त्याच्या संघाने 60.16 टक्के सामने जिंकले आहेत. धोनीच्या नेतृत्वात ही आकडेवारी 58.51 टक्क्यांवर आहे. सध्या रोहित शर्मा इंग्लंडमध्ये आहे. रोहितने आतापर्यंत 39 कसोटी सामने खेळले आहेत आणि 46.19 च्या सरासरीने 2679 धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर 7 शतके आणि 12 अर्धशतके आहेत. कसोटीत त्याचा स्ट्राइक रेट 57.9 इतका आहे. अशा परिस्थितीत रोहितकडून संघाला मोठ्या आशा आहेत. असेही आकाश चोप्रा यावेळी म्हणाला.