NEET UG 2024 Result: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा यंदा चर्चेत राहिली आहे. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET UG 5 मे 2024 रोजी 4,750 केंद्रांवर घेण्यात आली. यामध्ये सुमारे 24 लाख उमेदवार सहभागी झाले होते. 14 जून रोजी निकाल अपेक्षित होता, मात्र उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आधीच पूर्ण झाल्याने, 4 जून रोजी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. मात्र NEET-UG, 2024 च्या परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी पूर्ण 720 गुण मिळाले, जे नीटच्या इतिहासात आजपर्यंत घडलेले नाही. तसेच 1563 उमेदवारांना परीक्षेत ग्रेस गुण देण्यात आले. निकाल जाहीर होताच नीट विद्यार्थी आणि तज्ज्ञांनी यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी एनटीएविरोधात (NTA) सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि लोअर कोर्टात विविध याचिका दाखल करण्यास सुरुवात केली.
याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (13 जून 2024) महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, परीक्षा पूर्णपणे रद्द करणे योग्य नाही. परीक्षेच्या पावित्र्याला बाधा पोहोचली आहे, त्यामुळे आम्हाला एनटीएला नोटीस बजावून उत्तर मागावे लागेल. कोर्टाने या प्रकरणी पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या एका याचिकेवरील सुनावावणीवेळी केंद्र सरकारच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीने 1563 मुलांची पुनर्परीक्षा घेण्याचे सुचवले आहे. या मुलांनी पुन्हा पेपर न दिल्यास त्यांचे ग्रेस मार्क्स काढून घेण्याचा विचार केला जाऊ शकतो. आता एनटीएने एक निवेदन जारी करून माहिती दिली की, येत्या 23 जून 2024 रोजी सर्व 1563 उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. (हेही वाचा: NEET Exam 2024: देशभरातील राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षांमधील भ्रष्टाचाराकडे आदित्य ठाकरेंनी वेधलं केंद्र सरकारचं लक्ष; तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी केली 'ही' मागणी)
पहा पोस्ट-
NEET-UG 2024: Issue of Compensatory/Grace Marks
Re-test of all 1563 candidates will be held on 23rd June 2024. pic.twitter.com/G7mxKYUZ69
— National Testing Agency (@NTA_Exams) June 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)