Covid 19 | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

वर्षभरापूर्वी 2020 चं स्वागत करत नव्या दशकाचा आरंभ करण्यात आला होता. पण मागील 9 महिन्यांपेक्षा जास्त काळ कोरोना वायरसचं थैमान घालणारं ठरल्याने अनेकांचे शारिरीक,मानसिक, आर्थिक स्तरावर मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेकांना 2020 हे वर्ष त्यांच्या स्मरणातून काढून टाकावं अशी इच्छा आहे. पण थोडं मागे वळून बघितल्यास 2020 या वर्षाने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी देखील शिकवल्या आहे. वाईटातूनही चांगलं काय झालं ते पहा असा तुमचा या 2020 कडे पाहण्याचा दृष्टीकोन असेल तर आपण कळत नकळत काही चांगल्या गोष्टी अंगिकारल्या आहेत. आणि सहाजिकच त्या आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत. यामध्ये आत्मनिर्भर होण्याचा संकल्प असेल किंवा आरोग्याबाबत अधिक सजग राहण्याची सवय असेल ते अगदी लग्नापर्यंतचा सोहळा साधेपणात देखील होऊ शकतं हे आपल्याला नव्याने उमगलं आहे. मग पहा 2020 ने आपल्याला नकळत दिलेल्या काही चांगल्या गोष्टी, सवयींबद्दलचा हा लेखाजोखा! Year Ender 2020 YouTube: यंदाच्या वर्षात युट्युब वरील 'हे' आहेत ट्रेन्डिंग व्हिडिओ, भारतीय युजर्सकडून Chocolate Cake ची रेसिपी सर्वाधिक सर्च.

2020 वर्षाने दिलेल्या चांगल्या गोष्टी!

  • मोजक्या लोकांत आणि साधेपणातील लग्नसोहळे

लग्न म्हटलं की पूर्वी मानपानाच्या याद्या, आमंत्रितांच्या याद्या आणि लग्न सोहळा शाही करण्यासाठी होणारा भरमसाठ खर्च हे आलंच अशी धारणा होती. पण मागील वर्षभरात लग्न सोहळे मोजक्या लोकांत आणि साधेपणात करण्याला सुरूवात झाली. अनेकांनी विनाकारण केल्या जाणार्‍या अनेक खर्चांना कात्री लावली. आमंत्रितांची यादी देखील मर्यादित झाली.

  • वोकल फॉर लोकल

लॉकडाऊन मुळे अनेक गोष्टींची आयात-निर्यात बंद झाली त्यामुळे संसाराचा रहाटगाडा आणि मानवजातीसमोर उभं ठाकलेलं आरोग्य संकट परतवण्यासाठी नवनव्या कल्पना जन्माला येऊ लागल्या. आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी स्वदेशी वस्तू विकत घेण्याचा आग्रह झाला आणि अनेकांनी वोकल फॉर लोकलला प्रतिसाद देत भारतात बनणार्‍या अनेक वस्तू विकत देखील घेतल्या. दिल्ली: बाबांच्या भावूक व्हिडिओनंतर 'Baba Ka Dhaba' ला नेटकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद; पहा फोटोज आणि व्हिडिओज.

  • ऑनलाईन सोहळे

गाठीभेटींसाठी एकमेकांच्या घरी जाणं, बर्थडे, सण साजरे करताना शारिरीक अंतर ठेवण्याचं आवाहन करण्यात आल्याने अनेकांनी ऑनलाईन माध्यमातून हे सोहळे सेलिब्रेट करत एकमेकांशी कनेक्टेट राहत आनंद द्विगुणित करण्याचा नवा मार्ग शोधला.

  • उधळपट्टीवर निर्बंध

लॉकडाऊनमुळे काहींच्या नोकर्‍या, उद्योग धंदे बंद पडले. परिणामी आर्थिक खर्चांना कात्री लागलीच पण ज्यांच्याकडे आर्थिक सुबकता होती तसेच नोकरी सुरू होती त्यांना खर्च काटकसरीने करण्याची सवय लागली. भविष्यासाठी सेव्हिंग़, गुंतवणूक कशी आणि किती महत्त्वाची आहे याची जाणीव झाल्याने अनेकांनी उधळपट्टी थांबवली.

  • घरातच शेती

आतापर्यंत अर्बन शेती या संकल्पनेला फारसं मनावर न घेतल्यांना लॉकडाऊन तीही ओळख करून दिली. अनेकांनी भाज्या घरातच किंवा आजुबाजूच्या परिसरातच पिकवून त्याचा आहारात समावेश करून घेतला.

  • धान्याची साठवणूक

साठेबाजी ही चूकीची आहे यामुळे महागाई वाढू शकते किंवा फसवी धान्य टंचाई दिसून येत असली तरीही लॉकडाऊनच्या काळात धान्य, स्वयंपाकघरातील काही टिकाऊ वस्तू एकाच वेळी महिन्याभराच्या घेऊन ठेवल्याने अनेकांची सारखं घराबाहेर पडण्याची सवय मोडली.

  • गाड्यांचा वापर कमी

लॉकडाऊनच्या काळात खाजगी आणि सार्वजनिक गाड्यांचादेखील वापर कमी झाल्याने वातावरणातील प्रदुषण कमालीचं खालावलं होतं. हवा स्वच्छ झाल्याने अनेक इतर आजारांचा धोका कमी झाला.

गरज ही शोधाची जननी असते या उक्तीचादेखील अनेकांना प्रत्यय आला. काम धंदा गेल्याने अनेकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून या काळात अर्थाजन केले. 2020 ने सर्वात महत्त्वाची शिकवलेली गोष्टी म्हणजे लहान लहान गोष्टींमध्येही आनंद असतो. आपण नियंत्रणाबाहेर असलेल्या अनेक गोष्टींच्या मागे धावता धावता आपल्या हातात असलेल्या अनेक गोष्टींना गमावतो. पण नेमकं आपल्या गरजेचं काय आहे आणि त्याचा प्राधान्यक्रम कसा लावायचा याची मोठी ओळख या वर्षभरातील अनुभवाने आपल्याला दिली आहे.