World’s First Beer Powder: आता बाजारात आली 'बिअर पावडर'; अवघ्या काही मिनिटांत थंडगार ड्रिंक तयार, जाणून घ्या सविस्तर
Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

उन्हाळा सुरू होताच बाजारात बिअरची (Beer) मागणी वाढते. बिअरमध्ये अल्कोहोल असल्याने अनेक ठिकाणी तिचे सेवन केले जाऊ शकत नाही. अनेकवेळा दुकानातून घरी आणताना बिअर गरम होते. आता या सर्व समस्यांचे निराकरण झाले आहे. जर्मनीने आता बिअर पावडर (Beer Powder) तयार केली आहे, ज्याच्या वापरामुळे अगदी त्वरित थंडगार बिअर तुम्ही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त दोन चमचे बिअर पावडर थंड पाण्यात मिसळायची आहे. ही पावडर पर्यावरणासाठीही खूप फायदेशीर आहे, कारण पावडर बिअर बनवताना जास्त कार्बन उत्सर्जन होत नाही.

जर्मन न्यूज वेबसाईट DW मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पूर्व जर्मनीमध्ये बनवलेली ही बिअर पावडर हा अशा प्रकारचा पहिला शोध आहे. म्हणजेच आजपर्यंत कधीही पावडर स्वरूपात बिअर बनवली गेली नाही. ही बिअर पावडर बनवणाऱ्या नोएटसेल ब्रुअरीला वर्षाच्या अखेरीस ही बिअर पावडर बाजारात येईल, असा विश्वास आहे. यासोबतच ते म्हणतात की बाटलीबंद बिअरच्या निर्यातीमध्ये जेवढे कार्बन उत्सर्जन होते तेवढे या बिअर पावडरद्वारे होत नाही. (हेही वाचा: Viral Video: कर्जाचे हफ्ते थकवल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरचं उचलून नेली बाईक; पहा व्हिडिओ)

ही बिअर दोन मिनिटांत तयार होईल. बिअर बनवणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे की, तुम्ही ही पावडर खरेदी केल्यानंतर, तुम्हाला पाहिजे तेव्हा यापासून बीअर बनवू शकता. या पावडरचे दोन चमचे तुम्ही बाटलीत किंवा ग्लासभर पाण्यात टाकून मिक्स करा, त्वरित तुमची बिअर तयार होईल. मात्र, सध्या ही पावडर केवळ जर्मनीमध्ये उपलब्ध असल्याने संपूर्ण जगापर्यंत ती पोहोचण्यास वेळ लागेल. भारतामध्येही ही पावडर प्राप्त करण्यास काही काळ वाट पहावी लागेल, कारण भारतात या पावडरच्या विक्रीसाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतील.