Manjeshwar Brothers (Photo Credits: Youtube)

मागील काही दिवसांपासून तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब सह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन चिमुकल्यांना गाताना पाहिले असेल. रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना आणि आकाशी झेप घे रे पाखरा ही गाणी गातानाची या मुलांची व्हिडीओ क्लिप पाहून अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रवी जाधव (Ravi Jadhav), अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांच्यासहित अनेक कलाकारांनी सुद्धा या मुलांचे अगदी तोंड भरून कौतुक केले आहे. युट्युब वर मंजेश्वर ब्रदर्स (Manjeshwar Brothers) या नावाने सुरु असणाऱ्या पेजवरून त्यांचे व्हिडीओज पोस्ट केले जातात, या व्हिडीओजना हजारो व्ह्यूज आणि कमेंट्स आहेत. पण ही मुलं नेमकी आहेत कोण हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? आज आपण या लेखातून नेटकऱ्यांना थक्क करणाऱ्या या दोन चिमुकल्यांविषयी जाणून घेणार आहोत. त्यासोबतच त्यांचे आतापर्यंतचे व्हायरल झालेले हिट व्हिडीओज सुद्धा आपण या ठिकाणी एकत्रित पाहू शकता.

व्हायरल व्हिडीओ मधील या मुलांची नावं अर्जुन आणि आरव मंजेश्वर अशी आहेत. अमेय मंजेश्वर आणि सपना मंजेश्वर या दांपत्याची ही मुलं असून ही मंडळी ऑस्ट्रेलिया मधील मेलबर्न शहरात वास्तव्यास आहेत.

या जोडगोळीपैकी अर्जुन हा आठ वर्षाचा आहे तर आरव हा अवघा ४ वर्षांचा आहे. या दोघांनाही गाण्याची आवड आहे. अमेय मंजेश्वर यांनी सांगितल्यानुसार, अर्जुन सध्या संगीताचं प्राथमिक शिक्षण घेत आहे. तर आरव मात्र अर्जुनसोबत राहून गाणं शिकत आहे.

लॉक डाऊन मध्ये घरबसल्या अर्जुन आणि आरव यांचा एक व्हिडीओ त्यांच्या वडिलांनी म्हणजेच अमेय मंजेश्वर यांनी शूट करून ऑनलाईन पोस्ट केला होता. हा व्हिडीओ काहीच तासात तुफान व्हायरल झाला होता.

अर्जुन आणि आरव यांचा जन्म मेलबर्न मधील असल्याने त्यांना हिंदी आणि मराठी येत नाही. मात्र तरीही त्यांनी केलेला हा प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.

'हाल कैसा हे जनाब का' या गाण्याचा सर्वात पहिला व्हिडीओ अमेय यांनी त्यांचा फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता.

यानंतर 'गोरे गोरे ओ बाँके छोरे', 'होले होले साजना धीरे धीरे बालमा' ही हिंदीतील 'एव्हरग्रीन' गाणी गाऊन या चिमुकल्यांनी हजारो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

दरम्यान अलीकडे अशी अनेक मंडळी रातोरात ऑनलाईन सेन्सेशन झाली आहेत. आरव आणि अर्जुन ला सुद्धा या व्हिडीओजने प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांचे निरागस चेहरे आणि सूर पाहून अनेक जण त्यांचे फॅन झाले आहेत.