विवाहसोहळ्याच्या काही तासांपूर्वी अपघातात नवरी जबर जखमी, वराने स्ट्रेचरवरच बांधली लग्नगाठ; प्रयागराज येथील अनोखी लव्हस्टोरी व्हायरल
Marriage (Photo Credits: Pixabay)

प्रयागराज मधील अवदेश (Avdesh) आणि आरती मोर्या (Aarti Morya) यांचे 8 डिसेंबर रोजी लग्न ठरले होते. परंतु, लग्नाच्या 8 तासांपूर्वी एका भयानक दुर्घटनेमध्ये आरतीचा अपघात झाला आणि ती जबर जखमी झाली. या घटनेनंतर अवदेश लग्नाला नकार देईल, असे सर्वांना अपेक्षित होते. परंतु, त्याच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आरतीला झालेल्या अपघाताचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. अवदेशने केवळ लग्नाला होकारच दिला नाही तर ठरल्या दिवशी आरतीसोबत लग्नही केले. आरती उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रतापगड (Pratapgarh) मधील कुंदा व्हिलेज (Kunda Village) मधील रहिवासी आहे. या कपलची ही अनोखी लव्हस्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ABP Live ने दिलेल्या माहितीनुसार, आरती हॉस्पिटलमध्ये दाखल असताना तिला घरी घेऊन जाण्याची विनंती अवदेशने डॉक्टरांनी केली. त्याने अॅम्बुलन्समधून आरतीला घरी नेले आणि स्ट्रेचरवरुन तिला घरात आणले. आरती स्ट्रेचरवरच असताना अवदेशने तिच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नसमारंभ पूर्ण झाल्यानंतर अवदेशने पुन्हा आरतीला हॉस्पिटलमध्ये नेले. आता डॉक्टरांच्या उपचारानंतर आरतीची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. परंतु, पुढील काही महिन्यांसाठी तिला बेडवरच राहावे लागणार आहे. (एकाच मंडपात पार पडले आई आणि मुलीचे लग्न; UP च्या गोरखपूर जिल्ह्यातील अनोखा विवाहसोहळा चर्चेत)

दोन्ही घरात जोरदार लग्नाची तयारी सुरु असताना आरतीचा अपघात झाला. सर्व नातेवाईक तयारीत गुंतलेले असताना घराच्या टेरेसवर उभ्या असलेल्या लहान मुलाला वाचवण्यासाठी आरती पुढे गेली आणि तिचा पाय घसरुन ती टेरेसवरुन खाली पडली. यामध्ये तिच्या मणक्याला इजा झाली असून शरीरावर इतर ठिकाणीही तिला जखमा झाल्या आहेत. आरतीच्या घराच्यांनी या घटनेची माहिती अवदेशच्या कुटुंबियांना दिली. आरती सोबत हा प्रसंग घडल्यामुळे आरतीच्या आई वडीलांनी अवदेश समोर आरतीच्या बहिणीशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु, हा प्रस्ताव नाकारत अवदेशने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आणि आरतीसोबत बोलून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्टनुसार, लग्नविधी होत असताना आरतीचे डोळे पाण्याने भरुन आले होते. या अनोख्या लव्हस्टोरीची संपूर्ण परिसरात चर्चा रंगत असून सोशल मीडियातही ही प्रेमकथा व्हायरल होत आहे. अवदेशने घेतलेल्या या निर्णयाचे लोकांकडून कौतुक होत आहे.