Tamil Nadu Assembly Elections 2021: विदेशी गायींचे दूध प्यायल्याने भारतीय महिलांनी फिगर गमावली;  द्रमुक नेते Dindigul Leoni यांचे वादग्रस्त विधान
Dindigul Leoni | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, असम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यात विधानसभा निवडणूक 2021 सुरु आहे. दरम्यान, प्रचाराची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना राजकीय वाचाळवीर नेत्यांचीही चांगलीच चलती आहे. दररोज नवा नेता वाचळ विधाने करुन वाद ओढवून घेतो आहे. तामिळनाडू विधानसभा निडणूक 2021 (Tamil Nadu Assembly Elections 2021) प्रचारादरम्यान द्रमुक (DMK) नेते दिंडिगल लिओनी ( Dindigul Leoni) यांनी असेच एक वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला आहे. दिंडिगल लिओनी यांनी भारतीय महिलांबाबत आक्षेपार्ह विधान (Dindigul Leoni Controversial Statement) केले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 प्रचारादरम्यानही दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत अत्यंत वादग्रस्त विधान केले. “ममता दीदींनी साडीऐवजी बर्मुडा घालावा, म्हणजे त्यांचा पाय व्यवस्थित दिसेल”, असे दिलीप घोष यांनी म्हटले होते.

द्रमुक नेते दिंडिगल लिओनी काय म्हणाले?

'विदेशी गायींचे दूध प्यायल्यानेच आपल्याकडील महिलांनी फिगर गमावली आहे. त्यामुळे त्या जाड झाल्या आहेत' असे विधान दिंडिगल लिओनी यांनी केले आहे. आता दिंडिगल लिओनी यांच्या या विधानाची ऑडिओ, व्हिडिओ क्लिप जोरदार व्हायरल झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिंडीगल लिओनी हे द्रविड मुन्नेत्र कझगम पक्षाचे नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत ते कोइम्बतूर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार कार्तिकेय सिवसेनापती यांचा प्रचार करत होते. प्रचारादरम्यान, भाषण करताना त्यांची गाडी अचानक भारतीय महिलांच्या फिगरवरती घसरली. मे म्हणाले, 'आपल्याला माहितीच असेल आजकाल शेतात बऱ्याच गाई असतात. यात विदेशी गायीही असतात. या गायींचे दूध काढण्यासाठी लोक मशीन वापरतात. या गायी म्हणे प्रतिदिन 40 लीटर दूध देतात. या गायींचे दूध प्यायल्याने भारतीय महिलांनी फिगर गमावली आहे. पूर्वी भारतीय महिलांची फिगर ही इंग्रजीतल्या 8 आकड्यासारखी होती. परंतू आता या महिला विदेशी गायीचे दूध पिऊ लागल्याने त्यांची फिगर बॉलसारखी झाली आहे. पुर्वी त्या आपली मुले कडेवर घेऊ शकत असत. पण आता ती त्यांच्या कडेवरुन घरसरतात. आपल्याकडील महिलांप्रमाणे त्यांची मुलंही जाड झाली आहेत', असे काहीसे भलतेच विधान दिंडीगल लिओनी यांनी केले. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

धक्कादायक असे की, दिंडीगल लिओनी भाषण करत असताना भरकटल्याचे पाहून त्यांच्या कार्यकर्त्याने त्यांना सवाध केले. या कार्यकर्त्याने दिंडिगल यांच्या हातात रेशनिंगचे तांदूळ देऊन रेशनींगबाबत बोला असे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू, या कार्यकर्त्याचा प्रयत्न वाया गेला. दिंडीगल पुन्हा आपल्या मुळ मुद्द्याकडे आले. ते महिलांच्या फिगरबाबतच बोलत राहिले. दिंडीगल लिओनी आता वादाच्या भोवऱ्या अडकले आहेत. पक्षाच्या नेत्या कनिमळी यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी होऊ लागली आहे.