![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/ranveer-allahbadia-ac-1.jpg?width=380&height=214)
विनोदी कलाकार समय रैना याच्या रोस्ट शो 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) मध्ये विनोदी टिप्पणी करण्याच्या नादात भलतेच वादग्रस्त आणि तितकेच अनुचित विधान करणे रणवीर अलाहबादिया (Ranveer Allahbadia) यास चांगलेच भोलवले आहे. या कार्यक्रमात त्याने केलेल्या वादावरुन समाजमाध्यमे आणि जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत होता आणि वादही निर्माण झाला होता. या वादाची परिणीती अलाहबादिया याच्या फॉलोअर्सची संख्या घटण्यात झाली. ज्यामुळे सोशल मीडिया प्रभावक इन्फ्लुएंसर (Social media influencer), पॉडकास्टर आणि बीअरबायसेप्स म्हणूनही ओळखले जाणाऱ्या या व्यक्तिमत्वास चांगलाच फटका बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा वाद उद्भवल्यानंतर केवळ तीन दिवसांमध्ये अलाहबादिया याने इंस्टाग्रामवर जवळपास 50,000 फॉलोअर्स गमावले. त्याच्या मुख्य अकाउंट, बीअरबायसेप्सचे 9 फेब्रुवारी रोजी 45.27 लाख फॉलोअर्स होते, जे 11 फेब्रुवारीपर्यंत 44.80 लाखांवर घसरले. या घसरणीनंत चर्चा आहे की, वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या रणवीर यास पाल्य आणि पालकांनी चांगलाच इंगा दाखवला आहे.
फॉलोअर्सची संख्या घटते प्रमाण काम
हायपऑडिटर या प्रभावशाली विश्लेषण प्लॅटफॉर्मच्या हवाल्याने 'एनडीटीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर अलाहबादिया याच्या इंस्टाग्रामवर पेजवर 9 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुख्य अकाउंट, बीअरबायसेप्सचे 45.27 लाख फॉलोअर्स होते, जे 11 फेब्रुवारीपर्यंत 44.80 लाखांवर घसरले. म्हणजेच, अवघ्या तीन दिवसांमध्ये इंस्टाग्रामवर त्याने जवळपास 50,000 फॉलोअर्स गमावले. उल्लेखनीय असे की, त्याचे दुसरे अकाउंट, 'रणवीरअलाहबादिया' मध्येही लक्षणीय घट झाली, रविवारी त्याच्यावर 34.39 लाख फॉलोअर्स होते तेच पुढे तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 34.21 लाख झाले.
वादग्रस्त टिप्पण्यांमुळे सोशल मीडियावर संताप
'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका भागात कंटेंट क्रिएटर अपूर्व मुखिजा आणि विनोदी कलाकार आशिष चंचलानी आणि जसप्रीत सिंग यांच्यासोबत रणवीर अल्लाहबादिया हा वादग्रस्त टिप्पणी करताना दिसला. जी प्रामुख्याने आई-वडील आणि पालकांच्या लैंगिक संबंधांसंबंधी होती. या कार्यक्रमाचा व्हिडिओ युट्युबवर शेअर झाल्यानंतर आणि तो समाजमाध्यमातून व्हायरल झाल्यावर भलताच वाद निर्माण झाला. या व्हिडिओत तो सरळसरळ वादग्रस्त आणि अनुचीत टिप्पणी करताना पाहायला मिळत आहे. कार्यक्रमादरम्यान या टिप्पणीमुळे प्रेक्षक आणि सहकारी विनोदी कलाकार सुरुवातीला हसले असले तरी, या टिप्पणीमुळे लवकरच ऑनलाइन संतापाची लाट उसळली, ज्यामुळे सार्वजनिक टीका आणि कायदेशीर कारवाई झाली.
कायदेशीर कारवाई आणि सार्वजनिक टीका
रणवीर अल्लाहबादिया याच्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण पुढे येताच वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फलशंकर आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे सोमवारी औपचारिक तक्रार दाखल केली. आपल्या तक्रारीत त्यांनी असा युक्तिवाद केला की, अशा टिप्पणी महिलांचा अनादर करतात आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईची आवश्यकता आहे. (हेही वाचा: FIR Against Ranveer Allahbadia: रणवीर इलाहाबादियाच्या अडचणी वाढल्या; माफी मागितल्यानंतरही FIR दाखल)
वाद आणि प्रतिक्रिया
पत्रकार आणि गीतकार नीलेश मिश्रा यांनी या घटनेचा निषेध करत म्हटले आहे की, 'भारतात - प्लॅटफॉर्म किंवा प्रेक्षकांद्वारे - सभ्यतेला प्रोत्साहन दिले जात नाही आणि निर्माते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि अधिक उत्पन्नासाठी कार्यक्रमाचा स्तर आणखीही खाली खाली जात आहे.'
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी या वक्तव्यांबद्दल बोलताना म्हटले आहे, 'हे वक्तव्य सर्जनशील नाही. ते केवळ विकृत आहे आणि आपण अशा वर्तनाला थंडपणे, असे सामान्य करू शकत नाही. या आजारी टिप्पणीवर प्रक्षकांनी हसून दाद दिली ही गोष्ट आपल्या सर्वांना चिंताजनक वाटली पाहिजे.”
रणवीर अलाहबादिया याची जाहीर माफी
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यारुन व्यक्त होणारा संताप आणि निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अलाहबादिया याने जाहीर माफी मागितली. त्याबद्दलचा एक व्हिडिओही त्याने जारी केला आणि कबूल केले की त्यांचे विधान अयोग्य आणि अनुचित होते. आपल्या व्हिडिओत तो म्हणतो, 'माझी टिप्पणी केवळ अयोग्य नव्हती, तर ती अनुचित होती. विनोद हा माझा गुण नाही. मला माफ करा, असे ते म्हणाले.