![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/06/Maharashtra-Police.jpg?width=380&height=214)
बिअरबायसेप्स म्हणून ओळखला जाणारा युट्यूबर रणवीर अलाहबादिया (Ranveer Allahbadia) सध्या कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. या शोमध्ये रणवीरने स्पर्धकाला पालकांच्या लैंगिक संबंधांबद्दल एक प्रश्न विचारला होता. आता असल्या अश्लील प्रश्नाबाबत रणवीरवर कडाडून टीका होत आहे. याबाबत सोमवारी मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली. दुसरीकडे, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मंगळवारी युट्यूबर रणवीर अलाहबादिया याच्या वादग्रस्त टिप्पणीशी संबंधित अश्लील कंटेंट तयार आणि प्रकाशित केल्याच्या आरोपाखाली 30 ते 40 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला.
महाराष्ट्र सायबर पोलिसांचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी केली. हिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री प्रसारित करणे) आणि भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली हा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यात शोच्या पहिल्या भागापासून ते सहाव्या भागापर्यंत सहभागी असलेल्या सर्वांची नावे आहेत, ज्यात होस्ट रणवीर अलाहबादिया, तसेच इंडियाज गॉट लेटेंटचे कलाकार, सहभागी आणि जजेस यांचा समावेश आहे.
मंगळवारी, पोलिसांनी डिजिटल कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादिया आणि इंडियाज गॉट लेटेंटचा सूत्रसंचालक समय रैना यांना समन्स बजावले. पोलिसांच्या एका पथकाने अंधेरी वेस्टमधील सेव्हन बंगलोजजवळील बे व्ह्यू बिल्डिंग येथील अलाहाबादियाच्या निवासस्थानी जाऊन जबाब नोंदवले. खार पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. मात्र, अलाहाबादियाचा जबाब नोंदवण्याबाबत विचारले असता, अधिकाऱ्याने स्पष्ट उत्तर दिले नाही. (हेही वाचा: Ranveer Allahbadia Controversy: रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीमध्ये वाढ; संसदेत उपस्थित होणार मुद्दा, All Indian Cine Workers Association ने केली India's Got Latent वर तात्काळ बंदी घालण्याची मागणी)
दरम्यान, कॉमेडियन समय रैना, युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मखीजा यांचा समावेश असलेला, इंडियाज गॉट लेटेंटचा वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे. सरकारी आदेशानंतर युट्यूबने भारतात हा भाग ब्लॉक केल्याचे वृत्त आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून काढून टाकल्याचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ‘व्हिडिओ उपलब्ध नाही. सरकारकडून कायदेशीर तक्रारीमुळे हा कंटेंट या देशाच्या डोमेनमध्ये उपलब्ध नाही’, असे स्क्रीनवरील संदेशात म्हटले आहे.