'बियरबायसेप्स' म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) सध्या 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) या यूट्यूबवरील टॅलेंट शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. समय रैनाच्या या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारला होता. त्यानंतर याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी रणवीरवर टीका केली. इतकेच नाही तर, समय रैना आणि शोच्या आयोजकांविरुद्ध ‘अश्लीलता प्रसारित केल्याबद्दल’ तक्रारही दाखल करण्यात आली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
आता हा मुद्दा संसदेत पोहोचणार आहे. शिवसेना (यूबीटी) च्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संसदीय समितीसमोर हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणतात, ‘विनोदी कंटेंटच्या नावाखाली मर्यादा ओलांडणारा कोणताही अपशब्द स्वीकार्य नाही. तुम्हाला एक व्यासपीठ मिळते, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल. रणवीर हा लाखो सबस्क्राइबर्स असलेला असा माणूस आहे, अनेक राजकीय व्यक्ती त्याच्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत, पंतप्रधानांनी त्याला पुरस्कार दिला आहे, त्याला त्याची जबाबदारी समजायला हवी. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या स्थायी समितीचा सदस्य म्हणून, मी हा मुद्दा उपस्थित करेन.’
या वादानंतर रणवीरने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करून, त्याचा विनोदाचा प्रयत्न अयोग्य आणि असफल असल्याचे मान्य केले आणि संबंधित भाग शोच्या रेकॉर्डिंगमधून काढून टाकल्याचे सांगितले. या घटनेनंतर, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) यूट्यूबला या वादग्रस्त एपिसोडला प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याची विनंती केली आहे. मात्र अजूनही हा वाद थांबल्याचे दिसत नाही. इंडियाज गॉट लेटेंटशी संबंधित रणवीर अलाहबादिया, विनोदी कलाकार समय रैना, अपूर्वा मखीजा आणि इतरांविरुद्ध मुंबई आणि गुवाहाटीमध्ये पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: FIR Against Ranveer Allahbadia: रणवीर इलाहाबादियाच्या अडचणी वाढल्या; माफी मागितल्यानंतरही FIR दाखल)
दुसरीकडे, आता, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने एक प्रेस स्टेटमेंट जारी करून रणवीर अलाहबादिया आणि समय रैना यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आणि शोवर 'तात्काळ बंदी' घालण्याची मागणी केली आहे, जेणेकरून तो 'हानिकारक कंटेंट’ला पुढे प्रोत्साहन दिले जाऊ नये. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने म्हटले आहे, ते समय रैनाने आयोजित केलेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या निंदनीय आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांचा तीव्र निषेध करतात. त्यांनी पुढे, सर्व अभिनेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना या शोमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींशी कोणतेही सहकार्य तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे.