कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना (Shiv Sena), भाजपने (BJP) रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षातील काही नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असे असतानाच शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना दिलेल्या वाढदिवस शुभेच्छा फलकातून हा वाद ठळकपणे पुढे आला आहे. खासदार दिलदार है…लेकिन कुछ चमचो से लोग परेशान है’ अशी वाक्यरचना असलेला एक फलक शिवसेना नगरसेवक मल्लेश शिवान शेट्टी (Mallesh Shivan Shetty) यांनी हा फलक लावला आहे. त्यामुळे हे चमचे नेमके कोण या प्रश्नासोबतच हा फलकही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, कल्याण येथील नेतिवली चौकात मल्लेश शेट्टी यांचं कार्यालय आहे. या कार्यालयाजवळच हा फलक झळकवण्यात आला आहे. याच परिसरातून मुंबई, नाशिक आणि पुणे अशा तिन शहरांकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वाहतूक असते. हा फलक दर्शनी भागात असल्याने सर्वांचीच नजर या फलकाकडे जाते. परिणामी हा फलक आता चर्चेचा विषय ठरला आहे. या फलकासमोर बघ्यांची गर्दीही जमताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला काही हौशी मंडळी या फलकाचे फोटोही काढत आहेत. त्यामुळे हा बॅनर आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरु लागला आहे. (हेही वाचा, BMC Budget 2021: सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून सॅनिटायझर प्यायले; मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करतानाची घटना)
दरम्यान, कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय चक्रे वेगवान झाली आहेत. फोडाफोडीला उत आला असून पक्षांतरे वेगाने घडू लागली आहेत. डोंबिवलीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष राजेश कदम यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश नुकताच पार पडला. त्यानंतर अल्पावधीतच मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता मनसे या सर्व प्रकाराला कसे प्रत्युत्तर देते याबाबत उत्सुकता आहे.