गुजरातमधील मच्छू नदीवरील मोरबी पूल कोसळून मोठी दुर्घटना (Morbi Bridge Accident) घडली. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हा एक सस्पेन्शन ब्रिज होता व अपघातावेळी त्यावर जवळजवळ 500 लोक उभे असल्याचे अहवालांमध्ये म्हटले आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत 135 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत. परंतु इतक्या मोठ्या अपघातामधून अजूनही काही लोकांनी धडा घेतला नसल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रातील पुरुषांचा एक गट कर्नाटकातील येल्लापुरा (Yellapura) शहरातील झुलत्या पुलावर कार चालवताना दिसला आहे. यामुळे त्यांच्या आणि इतरांच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र पुलावर गाडी चालताना दिसताच स्थानिकांनी चालकाला पुलावरून गाडी मागे घेण्यास भाग पाडले. महत्वाचे म्हणजे या पुलाच्या देखभाल कर्मचार्यांच्या उपस्थितीमध्ये हा गट गाडी घेऊन ब्रिजवर चढला होता. कर्मचाऱ्यांनी त्यांना पुलावरून वाहन चालवण्यास मनाई केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
No lessons learnt post #MorbiBridgeCollapse . Hooligans/tourists from Maharashtra were seen driving a car on a suspension bridge at Yellapura town in Uttara Kannada district of Karnataka. Finally the locals ensured that the car was driven back from the bridge in reverse gear. pic.twitter.com/RvVPOhB8CL
— Harish Upadhya (@harishupadhya) November 1, 2022
ही घटना 31 ऑक्टोबर 2022 ची असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वृत्तानुसार हा पूल प्रसिद्ध पर्यटन स्थळ साथोडी धबधब्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. हा पूल यल्लापूर आणि उलुवी, दांडेली यांना जोडतो. हा पूल काली नदीवर तयार झालेल्या कोडसल्ली जलाशयाच्या पाण्यावर बांधला गेला आहे. (हेही वाचा: मच्छू नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी PM Narendra Modi मोरबी मध्ये दाखल; मृतांचा आकडा 135 वर)
दरम्यान, मोरबी अपघातानंतर आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मोरबी पूल जवळून पाहिला. त्यांनी बराच वेळ घटनास्थळाचे हवाई सर्वेक्षण केले. त्यांनी अपघातस्थळी पोहोचून मदतकार्याचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री या घटनेबाबत एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पीएमओ मोदी मोरबीला भेट देतील आणि जखमींची भेट घेणार असल्याची माहिती पीएमओने दिली होती. या अपघातानंतर आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे.