Fake News Alert | PC: Twitter/ PIB Fact Check

भारतामध्ये मागील दीड-दोन वर्षांपासून जशी कोरोना वायरसची (Coronavirus) दहशत आहे तशी या आजाराच्या भीतीचा गैरफायदा घेऊन काही खोट्या बातम्या, दावे देखील झपाट्याने पसरवले जात आहेत. अशामध्येच आता तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता लॉकडाऊन लावला जाणार आहे तर दिवाळी (Diwali) पर्यंत सार्‍या ट्रेन बंद ठेवल्या जाणार आहेत अशा बातम्या पसरवल्या जात होत्या. पण पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) कडून हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. केंद्र सरकार कडून लॉकडाऊन (Lockdown) किंवा ट्रेन बंद होणार असल्याची कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. नक्की वाचा: COVID-19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात NCDC ची महत्त्वपूर्ण माहिती.

दरम्यान मुंबई सह देशभरात आता कोविड 19 नियमावलीचं पालन करून हळूहळू सारे निर्बंध हटवण्यात आले आहेत. मुंबई मध्येही कोविड 19 चे दोन्ही डोस घेतलेल्यांना ट्रेनने प्रवास करण्याचा पास दिला जात आहे तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्येही कोविड 19 नियमावलीचं पालन करून आरक्षित तिकीट असलेल्यांना प्रवासाची मुभा आहे. त्यामुळे 12 ऑक्टोबर पासून ट्रेन बंद होणार असल्याचे कोणतेही मेसेज तुमच्या कडे आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका किंवा ते फॉर्वर्ड करू नका.

पीआयबी फॅक्ट चेक

भारतामध्ये कोविड 19 ची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यासोबतच कोविड 19 नियमावलीचं काटेकोर पालन करण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे. वायरल होत असलेल्या खोट्या दाव्यामध्ये दिवसाला 7 लाख लोकं कोरोनाबाधित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्याबाबतही सरकारकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.

देशातील सणासुदीचा काळ आणि गर्दी पाहता तिसर्‍या लाटेला हलक्यात घेऊ नका. पुरेशी काळजी घ्या असं आवाहन काही दिवसांपूर्वी आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.