Leopard Sion bridge (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) मध्ये अशा अनेक बातम्या समोर येत आहेत, ज्यामध्ये प्राणी, पक्षी रस्त्यावर किंवा मानवी वावर असलेल्या परिसरात निवांतपणे फिरत असलेली दिसत आहेत. परंतु अशा घटनांचा फायदा घेऊन अनेक बनावट किंवा फेक बातम्या शेअर करून लोकांना घाबरवले जात आहे. सध्या असेच मुंबईच्या (Mumbai) सायन पुला (Sion Bridge) जवळ बिबट्या (Leopard) दिसल्याचा मेसेज व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरवर व्हायरल होत आहे. काहींनी हा बिबट्या अंधेरीतील जेव्हीएलआर (JVLR) परिसरातील असल्याचे म्हटले आहे. मुख्य रस्त्यावर दुभाजकाजवळ बसलेल्या बिबट्याचा फोटो आणि व्हिडिओ अनेकांनी ऑनलाइन शेअर केले आहे. मात्र आता ही बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हिनेही ट्विटरवर ही बातमी पोस्ट करत, याच्या सत्यतेबद्दल विचारणा केली होती.

हा बिबट्या आपला रस्ता चुकल्याने तो रस्त्यावर बसला होता. परंतु अधिकारी त्याच्या बचावासाठी येण्यापूर्वीच तो जंगलात निघून गेला. हेच फोटो आणि व्हिडिओ मुंबईतील नागरिकांमध्ये भीती पसरविण्यासाठी वापरले जात आहे. मात्र आता समोर आलेले सत्य म्हणजे, काल हैदराबादच्या मैलारदेवपल्ली (Mailardevpally) भागात बिबट्या दिसला होता. हे पाहून अधिकाऱ्यांना पाचारण केले असता, ते त्या ठिकाणी पोहोचण्याआधीच बिबट्या तिथून जवळच्या जंगलात पळून गेला. बिबट्याला पाहून स्थानिक लोकांमध्येही गोंधळ उडाला होता, यामुळेही बिबट्या तिथून निघून गेला.

(हेही वाचा: लॉकडाउनच्या दरम्यान ठराविक दिवसांसाठी मुंबईतील सर्व दुकाने सुरु करण्यासाठी महापालिका आयुक्तांची परवानगी, जाणून घ्या WhatsApp वर व्हायरल होणाऱ्या मेसेज मागील सत्य)

आयएफएस परवीन कसवान यांनी सांगितल्याप्रमाणे या वन्य प्राण्याचा शोध अद्याप सुरू आहे. आशा आहे की, जंगलाकडे परत जाण्याचा मार्गावर हा बिबट्या सापडेल. अशा प्रकारे हा व्हिडिओ मुंबईतील सायन किंवा जेव्हीएलआर मधील असल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. हैद्राबादमधील बिबट्याचा व्हिडिओ मुंबईमधील आहे असे  खोटे सांगून व्हायरल केला गेला आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात ठाण्यात बिबट्या दिसून आल्याची बनावट बातमी पसरली होती. मात्र व्हिडिओमध्ये बिबट्या असल्याची ती खरी क्लिप तिरुपतीची होती. म्हणूनच कृपया अशा बनावट बातम्यांबाबत आणि दाव्यांविषयी सावधगिरी बाळगा. अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी व ते पुढे पाठवण्याआधी त्याची सत्यता पडताळून पहा.