Fact Check (Photo Credit : Twitter)

सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीमध्ये सोशल मिडियावर अनेक खोट्या बातम्या (Fake News) व्हायरल होत आहेत. जनताही अशा माहितीवर विश्वास ठेऊन त्याचे अनुसरण करते. आता व्हॉट्सअ‍ॅपवर ‘व्हॅक्सिनेशन वॉर्निंग’ या नावाने एक संदेश व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सांगितले गेले आहे की, ज्या व्यक्तीने कोरोना लस (Covid-19 Vaccine) घेतली आहे, त्याने कोणत्याही प्रकारची भूल (Anesthesia) घेऊ नये. अगदी स्थानिक भूल किंवा दंतचिकित्सक भूलही घेऊ नये. ही गोष्ट रुग्णासाठी धोकादायक ठरू शकते असेही या संदेशामध्ये नमूद केले आहे. आता पीआयबी फॅक्ट चेकने या दाव्याचे खंडन केले आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी कोरोना लस आणि भूल यासंदर्भातील व्हॉट्सअ‍ॅप संदेशही शेअर केला आहे. या संदेशामध्ये सांगितले आहे की, ‘ज्यांनी कोरोना विषाणूविरोधी लस घेतली आहे अशा लोकांनी कोणत्याही प्रकारची भूल घेऊ नये. भूल घेण्यासाठी लस घेतल्यानंतर त्यांनी 4 आठवडे थांबावे. लस घेतल्यानंतर 4 आठवड्यांमध्ये भूल घेणे हे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.’

महत्वाचे या संदेशामध्ये असा दावाही केला आहे की, एक नातेवाईक लस घेतल्यानंतर दंतवैद्याकडे दात दाखविण्यासाठी गेला, जिथे त्याला भूल दिली गेली. त्यानंतर त्वरित त्याचा मृत्यू झाला. याबाबत पीआयबीने सांगितले आहे की, ‘हा दावा पूर्णतः खोटा आहे. अशा गोष्टीची पुष्टी करण्यासाठी आजपर्यंत कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. अशा चुकीच्या माहितीला बळी पडू नका. लसीकरण करून घ्या.’ (हेही वाचा: Fact Check: Covid-19 लस घेतल्यावर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होते? जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य)

मलेशियन सोसायटी ऑफ एनेस्थेसियोलॉजिस्ट एण्ड कॉलेज ऑफ एनेस्थेसीओलॉजिस्ट, एकेडमी ऑफ मेडिसीन ऑफ मलेशिया यांनीही या व्हायरल मेसेजचे खंडन केले आहे. हा संदेश दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.