PIB Fact Check (Photo Credit : Twitter)

कोरोना विषाणूवर (Coronavirus) मात करण्यासाठी लसीकरणावर (Vaccination) सरकारने भर दिला आहे. सरकार जनजागृती करून लोकांना लस टोचून घेण्याचा सल्ला देत आहे. मात्र अजूनही सोशल मिडियावर लसीबाबत चित्र-चित्र दावे केले जात आहे व त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. आता महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एका व्यक्तीने दावा केला आहे की, कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यावर चुंबकीय शक्ती निर्माण झाली आहे. यामुळे स्टील व लोखंडाच्या वस्तू त्याच्या शरीराला चिकटत आहेत. याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. आता पीआयबी फॅक्ट चेकने या दाव्याचे खंडन केले आहे.

याआधीही अनेकांनी दावा केला होता की, लस घेतल्यानंतर आपल्या शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाली आहे. आता नाशिक सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार (71) यांनी सांगितले की, कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांच्या दंडाला स्टीलच्या व लोखंडाच्या वस्तू चिकटत आहेत. त्यांच्या हाताला अशा वस्तू चिकटत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीट करत माहिती दिली आहे की, लस लोकांना चुंबकीय बनवत नाहीत आणि ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे, ‘कोरोना विषाणू लस लोकांना मॅग्नेटिक बनवत आहे, असा दावा करणारे अनेक पोस्ट/व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोविड-19 लस लोकांना चुंबकीय बनवत नाहीत आणि ती पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे सर्वात मोठ्या लसीकरण ड्राइव्हसाठी नोंदणी करा आणि लस टोचून घ्या.’ (हेही वाचा: काय सांगता? Covid-19 लसीचा डोस घेतल्यावर अंगाला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा; Nashik मध्ये चर्चेला उधाण)

दरम्यान, कोरोना लसीबाबत लोकांची दिशाभूल करणारी माहिती वरचेवर शोषल मिडियावर व्हायरल होत असते. याआधी असा एक दावा केला होता की, लस घेतल्यानंतर 2 वर्षांनी त्या व्यक्तीचे निधन होऊ शकते. मात्र हा दावाही खोटा होता.