अंगाला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना विषाणूवर (Coronavirus) मात करण्यासाठी सध्या देशात लसीकरणावर (Vaccination) मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. याआधी अनेकदा लसीबाबत उलट-सुलट चर्चा ऐकायला मिळाल्या आहेत. सोशल मिडियावर लसीबाबत अनेक दावे केले गेले आहेत, मात्र अखेर त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे समोर आले होते. आता लस घेतल्यानंतर चुंबकत्व निर्माण होऊन, लोखंडाच्या व स्टीलच्या वस्तू हाताला चिकटत असल्याचा दावा नाशिकच्या (Nashik) एका व्यक्तीने केला आहे. सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार (71) यांच्या हाताला अशा वस्तू चिकटत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद सोनार यांनी 2 जून रोजी आपला कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांच्या मुलाने एका वृत्त वाहिनीवर लसीचा डोस घेतल्यावर अंगाला वस्तू चिकटत असल्याचे वृत्त पाहिले होते. त्याने आपल्या वडिलांवर याची चाचणी घ्यायचे ठरवले, आश्चर्य म्हणजे अरविंद यांच्या अंगाला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटूही लागल्या. त्यानंतर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला मात्र त्यांना याचे निदान करता आले नाही. हा नक्की काय प्रकार आहे याबाबत मी अजून डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे, असे अरविंद सोनार यांनी सांगितले.

मनपा रुग्णालय, मोरवाडी येथील डॉ. नवीन बाजी यांनीही या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. जिथे लस घेतली तिथल्या डॉक्टरांना भेटावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन  समितीचे कृष्णा चांदगुडे यांनीही सोनार यांची भेट घेतली. याबाबत वैद्यकीय चाचणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Fact Check: Covid-19 लस घेतल्यावर हातामध्ये वीज निर्माण होते? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमागील सत्य (See Video)

दरम्यान, याआधी एका व्हिडीओमध्ये दावा केला होता की कोविड-19 लसीकरणानंतर लसीकरण केलेल्या हातामध्ये वीज (Electricity) निर्माण होते. दंडावर जिथे लस घेतली त्याठिकाणी बल्ब पेटत असल्याचे व्हिडीओमध्ये सांगितले होते. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा फेटाळून लावला आहे.