परीक्षेमध्ये कॉपी करण्यासाठी अनेक युक्ता लढवल्या जातात. यात कॉपीबहाद्दर अगदी तरबेज असतात. आता असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Maharashtra Sanjay Pande) यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. पोलिस भरती परीक्षेत कॉपी करण्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (चक्क मुख्याध्यापकानेचं विद्यार्थ्यांना दिला कॉपी करण्याचा सल्ला; पहा व्हिडिओ)
जळगाव मधील विवेकानंद प्रतिष्ठान हायस्कूलमध्ये शनिवारी कॉन्स्टेबल भरतीसाठी लेखी परीक्षा होती. या परीक्षेदरम्यान, प्रतापसिंग बलोध नावाचा एक परीक्षार्थी संशयास्पदरीत्या हालचाली करत असल्याचं परीक्षकांना जाणवलं. तसंच परीक्षेपूर्वी दोनदा तो वॉशरुमला जावून आला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या कानामध्ये अत्यंत छोट्या आकाराची मायक्रोचिप असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्याने पायाला एक ब्लूटूथ डिव्हाईस बसवलं होतं. याद्वारे प्रतापसिंगचा मित्र त्याला प्रश्नांची उत्तरे सांगणार होता. मात्र परीक्षेपूर्वीच हा सर्व प्रकार उघडकीस आला. या व्हिडिओत त्याच्या कानातून चीप काढण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
पहा व्हिडिओ:
What an effort to cheat for constable exam in Jalgaon. Microchip in the ear!!! Worth noticing. @DGPMaharashtra @PIBMumbai pic.twitter.com/jal4cytlgO
— Sanjay (@sanjayp_1) October 9, 2021
प्रतापसिंग बलोध हा औरंगाबादच्या वैजापूरचा आहे. परीक्षेत कॉपी केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात भादंवि कलम 420 अंतर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्याला मदत करणाऱ्या मित्राचाही पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, कॉपीला आळा घालण्यासाठी यापूर्वी देखील अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र हे सर्व प्रकार पाहता आता व्यवस्था अधिक कडक असणे गरजेचे बनले आहे.