मुख्याध्यापकानेचं विद्यार्थ्यांना दिला कॉपी करण्याचा सल्ला (PC - ANI)

सध्या देशात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विविध केंद्रांवर परीक्षा सुरु झाल्या आहेत. अशातच काही केंद्रावर कॉपी (Copy) करण्याचे प्रकार घडत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये चक्क एका मुख्याध्यापकानेचं विद्यार्थ्यांना कॉपी करण्याचा सल्ला दिला आहे. या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना 100 रुपये द्या आणि कॉपी करा, असा सल्ला देत आहे.

मुर्खपणाचा कळस म्हणजे या मुख्याध्यापकाने कॉपी करताना पकडले गेलं, तर काय करायचं? याच्या टिप्सही विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. प्रवीण मल, असं या मुख्याध्यापकाचं नाव असून ते लखनौमधील एका खाजगी शाळेत उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत. (हेही वाचा - उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे सापडली 3000 टन सोन्याची खाण; योगी सरकार लवकरच सुरु करणार खाणकाम, त्यानंतर होणार लिलाव)

प्रवीण मल हे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना कॉपी संबंधी सुचना देत असताना एका विद्यार्थ्यांनी त्यांचा व्हिडिओ काढला आहे. या व्हिडिओनंतर संबंधित मुख्याध्यापकावर शिक्षण मंडळाने कारवाई केली आहे. या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना सल्ला देताना म्हणाले की, 'माझा कोणताही विद्यार्थी नापास होवू शकत नाही. तुम्ही परीक्षेदम्यान एकमेकांशी बोलून पेपर लिहू शकता. तुम्ही फक्त घाबरून जाऊ नका. तुम्ही ज्या शाळांमध्ये परीक्षा देणार आहात तेथील शिक्षक माझे मित्र आहेत. जर तुम्ही कॉपी करताना पकडले गेलात तर घाबरू नका. प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडवा. प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर आपल्या उत्तरपत्रिकेत 100 रुपयांची नोट ठेवून द्या. असे केल्यास शिक्षक तुम्हाला डोळे बंद करून मार्क देतील,' असंही मुख्याध्यापकाने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.