आयुष काढा फेक पोस्ट | Photo Credits: Twitter/ PIB Fact Check

भारत सध्या कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेचा सामना करत आहे. पण या संयमाची परीक्षा पाहणार्‍या काळात अनेकांना सोशल मीडीयात खोट्या बातम्यांपासूनही स्वतःला दूर ठेवावं लागत आहे. कोणतीही माहिती, सुत्रं न तपासता थेट अनेक खोटे, खळबळजनक दावे सहज व्हॉट्सअ‍ॅप, ट्वीटर सारख्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर शेअर केले जात आहेत. सध्या त्यापैकीच एक म्हणजे 'आयुष काढा' (Ayush Kadha) प्यायल्याने 3 दिवसांत कोरोनाबाधित ठीक होतो.' दरम्यान केंद्रीय आयुष मंत्रालयानेच काही दिवसांपूर्वी हा काढा सूचवला होता पण तो शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होता. त्यामुळे कोविड 19 मधून आपण मुक्त होऊ हा दावा चूकीचा आहे.

सध्या सोशल मीडीयामध्ये एका पोस्ट द्वारा काही घरगुती पदार्थांच्या मदतीने काढा कसा बनवायचा हे सांगत तो प्यायल्यास कोविड 19 मधून तुम्ही 3 दिवसांत बरे होऊ शकता असे म्हटलं आहे. सोबत आयुष मंत्रालयाने 6 हजार कोरोनाबाधितांना हा काढा दिल्यानंतर 5989 जण 3 दिवसांत कोविड निगेटीव्ह झाल्याचं फेक पोस्ट मध्ये सांगितलं आहे. पण PIB Fact Check ने हा दावा खोडून काढला आहे. त्यांनी या 'आयुष काढ्या'ला केवळ रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याचा एक पर्याय म्हणून पाहण्याचा सल्ला दिला आहे.

PIB Fact Check

दरम्यान हा कोविड 19 आणि त्याच्या उपचारावरील औषधांबाबत फिरणारा पहिला मेसेज नव्हे. यापूर्वी देखील ऑक्सिजन पातळी सुधारण्याबाबत ते दिवे लावून, टाळ्या वाजवून कोरोनाचा प्रभाव कमी होऊ शकतो असे एक ना अनेक खोटे दावे वायरल झाले आहेत. नक्की वाचा:  Fact Check: दिवसातून तीन वेळा चहा पिल्याने Covid-19 चा संसर्ग होणार नाही? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसेजमागील सत्य.

भारतामध्ये मागील दीड ते दोन महिन्यांपासून कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने होणारी वाढ चिंताजनक आहे.यामध्ये अनेकांचे मृत्यू वेळेवर उपचार न मिळाल्याने झाले आहेत. त्यामुळे आता कोविड 19 च्या उपचार पद्धतींमध्येही बदल करण्यात आले आहेत तसेच कोरोना वायरस मध्ये होणार्‍या म्युटेशनवर देखील वैज्ञानिक लक्ष ठेवून आहेत.