Hospital | Pixabay.com

मुंबई (Mumbai)  मध्ये आता झिका वायरसचा (Zika Virus) दुसरा रूग्ण समोर आला आहे. एल वॉर्ड कुर्ला परिसरामध्ये 15 वर्षीय मुलीला झिकाची लागण झाल्याचं निदर्शनास आलं आहे. 20 ऑगस्ट पासून या मुलीला ताप आणि डोकेदुखीचा त्रास होत आहे. यापूर्वी चेंबूर भागामध्ये 79 वर्षीय एका व्यक्तीला झिकाची लागण झाली होती. उपचारानंतर ती व्यक्ती आता आजारपणातून बाहेर पडली आहे. या दोन्ही रूग्णांना साधारण सारख्याच वेळी झिकाची लागण झाली होती.

दोन्ही रूग्णांना को मॉर्बिटीज आहेत त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर आता त्यांना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 5 सप्टेंबरला रूग्णाला सरकारी रूग्णालयात नेल्याचे बीएमसीच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.

झिका वायरसचा प्रादुर्भाव झाल्याने होणारा हा एक सौम्य स्वरूपाचा आजार आहे. Aedes mosquitoes म्हणजेच डासातून त्याचा प्रसार होतो. Aedes mosquitoes मुळे डेंगी आणि चिकनगुनिया देखील होण्याचा धोका असतो. झिका वायरस हे वायरल इंफेक्शन असले तरीही ते कोविड सारखे झपाट्याने पसरत नाही.

पालिका प्रशासनाकडून मुलगी ज्या भागात राहत होती तेथील पाहणी केली आहे. या भागामध्ये अन्य नागरिकांना झिका ची लागण झाल्याचं किंवा तापाचा रूग्ण आढळला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

झिका वायरसच्या रूग्णांमध्ये ताप, अंगावर रॅश येणं, डोळे येणे, स्नायू, सांधे दुखणं, डोकेदुखी अशी लक्षणं आढळतात. दरम्यान या वायरसची लागण होऊन देखील सुमारे 80% रूग्ण हे asymptomatic असतात. मात्र आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, को मॉर्बिटीज असलेल्यांमध्ये तीव्र स्वरूपाचं इंफेक्शन दिसू शकतं. त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावं लागतं.

दरम्यान सध्या पालिकेने नागरिकांना डासांची उत्पत्ती होईल अशा गोष्टी टाळण्याचं आवाहन केले आहे. घराजवळ असलेल्या पाण्याच्या टॅन्क्स नीट बंद ठेवण्याचे, पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.