New Mumbai Shocker: प्रेयसीची हत्या करून तरुणाची ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिला गर्लफ्रेंडचा मृतदेह लपवलेल्या जागेचा कोड
Forest, Murder (Photo Credit - pixabay.com)

New Mumbai Shocker: नवी मुंबईतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रेयसीची हत्या (Murder) केल्यानंतर तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये एक सुसाईड नोट (Suicide Note) लिहिली होती, ज्यामध्ये त्याने एक कोडही (Code) लिहिला होता. ज्याद्वारे पोलिसांना त्याच्या प्रेयसीचा मृतदेह सापडण्यास मदत झाली. पोलिसांनी दोघांचेही शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आणि गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

काय आहे नेमकं प्रकरण?

कळंबोली येथील वैभव बुरुंगले या युवकाचे खारघर येथील एका 19 वर्षीय तरुणीशी संबंध होते. काही कारणास्तव मुलीने मुलाशी संबंध तोडले होते. याच कारणावरून त्याने प्रेयसीचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह खारघरच्या जंगलात फेकून दिला. यानंतर तरुणानेही लोकल ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. मुलाने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना त्याच्या मोबाईलमधून सुसाईड नोट सापडली, त्या आधारे पोलीसांनी त्याच्या प्रेयसीच्या मृतदेहाचा शोध घेतला. (हेही वाचा -Mumbai News: 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट, मुंबईतील करी रोड येथील घटना)

कोडद्वारे भेटला प्रेयसीचा मृतदेह -

तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या कोडची चौकशी केल्यानंतर हा कोड वनविभागाने झाडांवर लिहिला असल्याचे पोलिसांना समजले. या कोडची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या कोड क्रमांकासह झाडाजवळ पोहोचले असता तेथे मुलीचा मृतदेह आढळून आला. खारघरमधील जंगलातील झाडाजवळील झुडपात मुलीचा मृतदेह फेकण्यात आला होता. (हेही वाचा - Nagpur Shocker: हात शेकण्यासाठी शेकाटी पेटवली; झोपडीला आग लागल्याने दोघांचा भांवडाचा मृत्यू)

तब्बल 34 दिवसांनी सापडला मृतदेह -

खारघर येथील रहिवासी मुलगी बेपत्ता झाल्याचा अहवाल आल्यानंतर पोलीस तिच्या शोधात व्यस्त होते. पण काही सुगावा लागला नाही. मुलगी 12 डिसेंबर 2023 रोजी कॉलेजसाठी घरून निघाली होती. मात्र त्यानंतर ती परतली नाही. या कारणावरून कुटुंबीयांनी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी बेपत्ता मुलीची नोंद करून तपास सुरू केला होता. या तरुणाने 12 डिसेंबर रोजी मुलीचा गळा दाबून खून केला होता. यानंतर त्याने स्वतः जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.

तथापी, तरुणाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये L01.501 असे लिहिले होते, हा कोड प्रथम पोलिसांना समजला नाही. मात्र, या कोडची चौकशी केली असता हा कोड वनविभागातील झाडाचा असल्याचे त्यांना समजले. पोलिसांना काही वेळातच मुलीचा मृतदेह सापडला. मुलीच्या मृतदेहाची ओळख तिच्या कपड्यांवरून आणि इतर साहित्यावरून करण्यात आली.