Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. यातच देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक परिस्थिती निर्माण झाली असताना यवळमाळ येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. यवतमाळ (Yavatmal) येथील एका जाखगी रुग्णालयात मृतदेहाची आदलाबदल झाल्याने संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी (Awdhutwadi Police) घटनास्थळी धाव घेऊन तेथील परिस्थिती नियंत्रण मिळवले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ॲड अरुण गजभिये यांना आजारापणामुळे यवतमाळ येथील शहा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आज सकाळी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह घेऊन सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामात पोहोचले. तेथे त्यांनी रॅपरमध्ये गुंडाळलेला मृतदेह उघडून बघितला असता तो ॲड.गजभिये यांचा नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेवून प्रशासनास जाब विचारला. मात्र, उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने संताप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. हे देखील वाचा- Majha Doctor: कोरोनाशी लढण्यासाठी सीएम उद्धव ठाकरे यांनी सुरु केली 'माझा डॉक्टर' मोहीम; फॅमिली डॉक्टरांना नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन

महत्वाचे म्हणजे, ॲड. गजभिये यांच्या मृतदेहाऐवजी त्यांच्या नातेवाईकांना आर्णी येथील सेवानिवृत्त सहायक फौजदार दिगांबर शेळके यांचा मृतदेह देण्यात आला. शेळके यांचाही मृत्यू शनिवारी रात्रीच झाल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्यांच्या नातेवाईकांकडून देयकाची रक्कम जमा न केल्याने शेळके यांचा मृतदेह व्यवस्थापनाने दिला नाही, असा आरोप शेळके यांचे नातेवाईक करत आहेत.

दरम्यान, मृतदेहाची आदलाबदल होण्याची ही पहिली घटना नसून कोरोना काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. एवढेच नव्हेतर, कित्येकांनी आपल्या घरातील सदस्याचा मृतदेह समजून दुसऱ्याच व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले आहेत.