Dog Attack In Ahmedabad (फोटो सौजन्य - X/@DRakesh1011)

Dog Attack In Ahmedabad: अहमदाबादमधील एका रहिवासी सोसायटीमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, येथील राधे रेसिडेन्सीमध्ये, एका पाळीव कुत्र्याने अचानक एका 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला (Dog Attack 4-Month-Old Girl) केला. या रॉटविलर (Rottweiler) जातीच्या पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात चार महिन्यांची मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हथिजन सर्कल येथील राधे रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या प्रतीक दाभी यांची 4 महिने 17 दिवसांची मुलगी ऋषिका हिला तिची मावशी मांडीवर घेऊन बसली होती. त्याच वेळी, जवळच राहणारी एक महिला तिच्या रॉटविलर पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर आली. ती महिला फोनवर बोलत असताना कुत्र्याचा पट्टा तिच्या हातातून निसटला आणि कुत्र्याने चिमुरडीवर हल्ला केला.

या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये रात्री 9 वाजताच्या सुमारास, रॉटविलर कुत्रा अनियंत्रित होऊन चिमुरडीचा चावा घेताना दिसत आहे. फुटेजमध्ये ऋषिका तिच्या मावशीच्या मांडीवर दिसत आहे. हल्ल्यादरम्यान, मुलगी तिच्या मावशीच्या मांडीवरून जमिनीवर पडते आणि कुत्रा तिच्यावर क्रूर हल्ला करतो. जवळच उभी असलेली एक महिला मुलीला वाचवण्यासाठी धावते आणि तिला कुत्र्यापासून वाचवते, तिला आपल्या मांडीवर घेते आणि तिथून दूर घेऊन जाते. यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा -Mira Road Stray Dog Attack Case: मीरारोड मध्ये 8 वर्षीय मुलावर कुत्र्याचा भीषण हल्ला; डॉक्टरांनी दिला प्लॅस्टिक सर्जरीचा सल्ला)

रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला - 

अहमदाबाद महानगरपालिकेच्या नियमांनुसार, सर्व पाळीव कुत्र्यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. आता हा रॉटविलर कुत्रा त्याच्या मालकाने महापालिकेत नोंदणीकृत केला होता की, नाही याचा तपास सुरू आहे. मुलीच्या मृत्यूनंतर स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. तथापी, कुटुंबाने विवेकानंद पोलिस ठाण्यात कुत्र्याच्या मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच, सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांना एक अर्ज देऊन कुत्र्याच्या मालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.