Stray Dog Bite | Pixabay.com

मीरारोड (Mira Road) मध्ये 8 वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला (Stray Dog Bite) केल्याचा प्रकार समोर आला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये चिमुकल्याला गंभीर जखमाझाल्याचं समोर आलं आहे. ही घटना सोमवार 16 डिसेंबरच्या सकाळची आहे. हा मुलगा फूटबॉल खेळत असताना घराबाहेर त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केला आहे. नक्की वाचा: Mumbai Stray Dog: मुंबईत तीन वर्षांत 3 हजार श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ .

चिमुकल्याच्या चेहर्‍यावर गंभीर जखमा

कुत्र्याच्या हल्ल्यानंतर या चिमुकल्याच्या चेहर्‍याला, तोंडाला गंभीर जखमा झाल्या आहेत. या मुलाचं नाव दक्ष रावत आहे. हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्ट्स नुसार, मीरा रोड मध्ये पूनम सागर भागामध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे. लहान मुलगा फूटबॉल खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने त्याचा पाठलाग केला. त्या मुलाकडून प्रतिकार करण्यापूर्वीच चेहर्‍यावर आणि तोंडावर कुत्र्याने हल्ला केला होता. तातडीने त्याच्या मित्रांनी दक्षच्या कुटुंबियांना कळवले. त्यांनी दक्षला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी मुलाची स्थिती पाहून आता प्लॅस्टिक सर्जरीचा सल्ला दिला आहे. या मुलाच्या चेहर्‍यावर गंभीर जखमा आहेत.

कुत्र्याचं काही दिवसांपूर्वीच व्हॅक्सिनेशन

दक्षच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलाने कुत्र्याची कळ काढली नव्हती तसेच काही दिवसांपूर्वीच त्या कुत्र्याचे व्हॅक्सिनेशन झाले होते. याच कुत्र्याने काही दिवसांपूर्वी सोसायटी मध्ये काही डिलेव्हरी बॉय आणि मुलांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर दक्षच्या वडिलांनी जेव्हा प्रशासनाला हा प्रकार कळवला तेव्हा त्यांनी या कुत्र्याचे काही दिवसापूर्वीच लसीकरण झाल्याचं म्हटलं आहे.

मिरा-भाईंदर भागात दररोज सरासरी 32 जणांना कुत्रे चावल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मीरा-भाईंदर भागात सुमारे 30,000 भटकी कुत्री असून त्यापैकी काहींनी नागरिकांवर हल्ला केल्याचेही वृत्त आहे.