सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणू (Coronavirus) विरुद्ध लसीकरण (Vaccination) मोहीम चालू आहे. जनतेला लस देण्याबाबत महाराष्ट्र अग्रेसर आहे. याआधी लसीकरण केंद्रांवर मारामारी, भांडणे, डॉक्टरांवर झालेले हल्ले अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सध्या लसींचा पुरवठा वाढला तरी अशा घटना सुरूच आहेत. महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये (Yavatmal) वैद्यकीय अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोविड-19 लसीकरण रांग मोडू दिली नसल्याने या व्यक्तीने डॉक्टरांवर हल्ला केला.
सोमवारी या 32 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली, पोलिसांनी याबाबत माहिती दिली. दिग्रस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंत नगरमध्ये हा प्रकार घडला, सुदैवाने यामध्ये डॉक्टरला कोणतीही इजा झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनोहर राठोड लसीकरण केंद्रावर आला. तो रांगेत उभा होता मात्र त्याने सर्वांच्या आधी आपल्याला लस दिली जावी अशी मागणी केली. त्यावेळी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष जाधव यांनी राठोडला आधी नोंदणी करण्यास सांगितले. यावर चिडलेल्या राठोडने जाधव यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.
मात्र नंतर त्याने माघार घेतली व पुढील दुखापत टळली. त्यानंतर जाधव यांच्या तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. याआधी अंबिकापूर, छत्तीसगडमध्ये लसीकरणासाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या टीमवर गावकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या टीमला शिवीगाळ करून त्यांनी धक्काबुक्की केली तसेच त्यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाणही केली होती. कसेतरी तिथून निसटून या टीमने आपले प्राण वाचवले होते. (हेही वाचा: Pune Shocking: संपत्तीच्या वादातून मोठ्या बहिणीला जीवंत पेटवून दिले, पुण्यातील धक्कादायक प्रकार)
दरम्यान, महाराष्ट्रात आज सोमवारी 32 करोना बाधितांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात 2895 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात 2432 नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.