Pune Railway Station | (Photo Credit: twitter)

Pune Railway Station Brawl Videos: पाठिमागील काही दिवसांपासून नागरिकांमध्ये परस्परांमध्ये होत असलेल्या हाणामारीच्या व्हिडिओंची आणि त्यांच्या व्हायरल होण्याची संख्या वाढते आहे. मुळात अशा घटनाच वाढत असल्याने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंची संख्याही प्रचंडच वाढते आहे. पुणे रेल्वे स्थानक फलाटावर घडलेल्या एका घटनेचाही व्हिडिओ असाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आहे की, दोन प्रवासी एकमेकांसोबत जोरदार हाणामारी करत आहेत. धक्कादायक म्हणजे उपस्थित गर्दीने केवळ बघ्याची भूमिका घेत थेट व्हिडिओ शूट करणे पसंत केले. मात्र, कोणीही भांडण सोडवायला पुढे आलेले पाहायला मिळाले नाही.

पुणे रेल्वे स्टेशन फलाटावर एकमेकांसोबत फ्री स्टाईल हाणामारी करणाऱ्या या दोन व्यक्ती कोण आहेत याबातब माहिती मिळू शकली नाही. परंतू, त्यांच्याकडे असलेले सामान आणि स्थळ पाहता हे दोघेही प्रवासी असावेत असेल बोलले जात आहे. एकमेकांसोबत भांडणाऱ्या दोन्ही व्यक्ती इतक्या टोकाला पोहोचल्या आहेत की ते परस्परांना लाथाबुक्यांनी मारहाण करत आहेत. इतकेच नव्हे तर एकाने दुसऱ्याला उचलून जमीनीवर आपटले. सलग दोन वेळा जमीनीवर आदळण्याल्याने यातील एकाला जबर मार लागला आणि तो जमीनीवरच पडलेला व्हिडिओत पाहायला मिळते. खाली पडणाऱ्या व्यक्तीचे डोके जमीनीवर आदळताना येणारा आवाजही व्हिडिओत रेकॉर्ड झाला आहे.

ट्विट

पुणे स्टेशनवर घडलेला प्रकार स्टेशन मास्तरांच्या केबीनपासून काहीच अंतरावर घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे स्टेशनवर असलेले सुरक्षा रक्षक काय करत होते? प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी रेल्वे प्रशासनाला आहे किंवा नाही? रागाच्या भरात जर एखाद्याचा जीव गेला, काही अनुचीत प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपस्थित केले जात आहेत. या घटनेमुळे नागरिकांनी रेल्वे सुरक्षा आणि नव्यानेच सुरु झालेली मेट्रो सुरक्षा यातील व्यवस्थापनाची तुलना सुरु केली आहे. रेल्वे प्रशासनाच्या तुलनेत नव्यानेच सुरु झालेली पुणे मेट्रोची सेवा अधिक चांगली असल्याचे बोलले जात आहे.