प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

मुंबईकरांचा एसी लोकलला (AC Local) वाढता प्रतिसाद पाहता आता पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Railway Line) एसी लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 20 जून 2022 पासून पश्चिम रेल्वे मार्गावर 8 नव्या एसी लोकल सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता या मार्गावरील लोकलची संख्या 32 वरून 40 करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार्‍या 8 नव्या लोकल्स या अप-डाऊन मार्गावर प्रत्येकी 4 असतील. या लोकल विरार ते चर्चगेट, विरार ते दादर, वसई ते चर्चगेट आणि मालाड ते चर्चगेट अशा अपमार्गावर असतील. तर डाऊन मार्गावर दादर ते विरार, चर्चगेट ते विरार, चर्चगेट ते वसई आणि चर्चगेट ते मालाड अशा नव्या एसी लोकल असतील.

पहा नव्या एसी लोकलचं वेळापत्रक

एप्रिल महिन्यात एसी लोकल मध्ये 22 हजार लोकांनी प्रवास केला तर मे महिन्यात तो वाढून 32 हजार झाला होता. मे महिन्यात रेल्वेकडून सिंगल राईडसाठी एसी लोकलच्या दरात 50% कपात जाहीर करण्यात आली आणि नंतर हळूहळू एसी लोकलला प्रतिसाद वाढला आहे. सध्या मुंबईमध्ये मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गावरच एसी लोकल चालवली जाते. हार्बर मार्गावरील एसी लोकल अल्प प्रतिसादामुळे बंद करण्यात आली आहे.