Britannia

मुंबईतील दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (District Consumer Disputes Redressal Commission) ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड (Britannia Industries Ltd) आणि चर्चगेट येथील एका दुकानदाराला, गुड डे बिस्किटांच्या (Good Day Biscuits) पॅकेटमध्ये जिवंत किडा आढळल्याप्रकरणी 1.75 लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही घटना 2019 मध्ये घडली होती. मालाड येथील एका 34 वर्षीय आयटी व्यावसायिक महिलेने हे बिस्किट खाल्ल्यानंतर तिची तब्येत बिघडली. यावेळी तिला पॅकेटमध्ये किडा आढळला. तक्रारदाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अन्न विश्लेषण प्रयोगशाळेत बिस्किट तपासणीसाठी पाठवले, ज्यामध्ये बिस्किट मानवी वापरासाठी अयोग्य असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तिने कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला.

माहितीनुसार, 2019 मध्ये, मालाड येथील या महिलेने चर्चगेट स्टेशन येथील अशोक एम. शहा या अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडून ब्रिटानियाचे गुड डे बिस्किटांचे पॅकेट खरेदी केले. कामावर जाताना तिने हे पॅकेट विकत घेतले आणि दोन बिस्किटे खाल्ल्यानंतर तिला मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. पॅकेट तपासताना तिला त्यात जिवंत किडा आढळला. तिने तात्काळ दुकानदाराकडे तक्रार केली, परंतु दुकानदाराने तिची तक्रार गांभीर्याने घेतली नाही. त्यानंतर तिने ब्रिटानियाच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला, परंतु तिथेही तिला समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

महिलेने 4 फेब्रुवारी 2019 रोजी ब्रिटानियाला कायदेशीर नोटीस पाठवली, ज्यामध्ये तिने मानसिक त्रास आणि आरोग्याच्या समस्यांसाठी 2.5 लाख रुपये आणि खटल्याच्या खर्चासाठी 50,000 रुपये नुकसानभरपाई मागितली. ब्रिटानियाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, तिने मार्च 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात औपचारिक तक्रार दाखल केली. तक्रारदाराने बिस्किटांचे पॅकेट आणि त्यातील बॅच तपशील जतन केले आणि ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अन्न विश्लेषण प्रयोगशाळेत तपासणीसाठी सादर केले. प्रयोगशाळेच्या अहवालात बिस्किटांमध्ये जिवंत किडा असल्याची पुष्टी झाली आणि ते मानवी वापरासाठी अयोग्य असल्याचे घोषित केले गेले. (हेही वाचा: Big GST Relief Likely On Essentials: जीएसटीमध्ये मिळू शकते मोठी सवलत; दैनंदिन वस्तूंवरील कर 12% वरून 5% पर्यंत कमी होण्याची शक्यता- Reports)

आता दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने, या प्रकरणाची सुनावणी करताना नमूद केले की, ब्रिटानियाने आणि दुकानदाराने बिस्किट पॅकेट दूषित नसल्याचे सिद्ध करण्यात अपयश दर्शवले आहे. ब्रिटानियाने आपल्या कठोर गुणवत्ता तपासणी प्रक्रियेचा दावा केला, परंतु त्याला पाठिंबा देण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत. आयोगाने म्हटले की, दूषित बिस्किट विक्री हा ग्राहकांच्या विश्वासाचा आणि अन्न सुरक्षा कायद्यांचा गंभीर भंग आहे. यामुळे, ब्रिटानिया आणि दुकानदार यांना संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे जबाबदार धरले गेले. आयोगाने त्यांना तक्रारदाराला 1.75 लाख रुपये देण्याचा निर्णय दिला.