Sanjay Raut on Central Government: जागतिक नेत्यांना गुजरातमध्ये नेलं जातं, मुंबईत का नाही? संजय राऊत यांचा केंद्र सरकारला सवाल
Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

Sanjay Raut on Central Government: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी परदेशी नेत्यांना गुजरातमध्ये घेऊन जाणाऱ्या केंद्र सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील आपल्या साप्ताहिक स्तंभात व्यवसायाची राजधानी मुंबईचे पंख छाटण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर टीका केली आहे.

विविध मुद्द्यांवरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनानिमित्त बोलताना संजय राऊत म्हणाले की, केंद्रातील भाजप नेतृत्वाला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान विसरले आहे. ज्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना का बोलावण्यात आले नाही? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. (हेही वाचा - Dipali Sayyad on Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये; दीपाली सय्यद यांचा इशारा)

महाराष्ट्राला राष्ट्रीय राजकारणातून बाहेर काढण्याची ही प्रक्रिया असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जागतिक नेते मुंबईत येत नसल्याने त्यांना आधी गुजरात आणि नंतर दिल्लीला नेले जाते, असा आरोप राऊत यांनी केला. राऊत यांनी लिहिले की, 'काही आठवड्यांपूर्वी शरद पवार यांनी दुःख व्यक्त केले की, पंतप्रधान मोदी जगातील नेत्यांना गुजरातमध्ये घेऊन तेथील विकास दाखवतात.'

शरद पवार जेव्हा असे मुद्दे मांडतात तेव्हा त्यांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. संजय राऊत यांनी आपल्या संपादकीयमध्ये लिहिले आहे की, 'पीएम मोदी संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत, अजून बरीच शहरे आहेत.' माजी मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, मुंबईत शिवसेना नसती तर तो केंद्रशासित प्रदेश झाला असता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर काढले नाही तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर हनुमान चालीसा वाजवतील, अशी धमकी राज्य सरकारला दिली होती. या वादावर भाष्य करताना शनिवारी संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी शिवसेनेवर फुलांचा वर्षाव केला असता.