Thane: पत्त्यांच्या क्लबमध्ये घुसून एका तरुणावर चॉपरने सपासप वार; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर
Representational Image (Photo Credits: PTI)

आपल्या विरोधात साक्ष का दिली म्हणून दोन जणांनी एका तरूणावर चॉपरने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना ठाण्यातील (Thane) वागळे इस्टेट (Wagle Estate) येथे घडली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी (Thane Police) दोन्ही आरोपीला अटक केली आहे. या हल्ल्यात संबंधित तरूण गंभीर जखमी झाला असून एका जाखगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

प्रथमेश निगुडकर असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर, मंदार गावडे आणि अभिषेक जाधव असे दोन्ही आरोपींचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका पत्त्यांच्या क्लबमध्ये बसला होता. त्यावेळी मंदार आणि अभिषेक हे दोघेही त्या क्लबमध्ये आले. दरम्यान, प्रथमेश समोर दिसताच या दोघांनी आपल्या हातातील धारदार शस्त्र चॉपरने त्याच्यावर वार करायला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी प्रथमेशला पत्त्याच्या क्लबच्या खाली नेले आणि तेथेही त्याला मारहाण केली आणि दोघेही प्रथमेशला त्याच अवस्थेत सोडून पळून गेले. या या हल्ल्यात प्रथमेशच्या डोक्यात, हातावर, मानेवर, छातीत आणि पोटावर जखम झाली आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा-Pune: डेटिंग अॅपवरून महिलेशी मैत्री करणे एका तरूणाला पडले महागात; नेमके काय घडले? वाचा सविस्तर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा आपल्या साथीदारांसह गेल्या वर्षी ठाणे शहराच्या हद्दीत असलेल्या गरम मसाला या हॉटेलमध्ये गेला होता. त्यावेळी मंदार गावडे आपल्या साथीदारांसह मिळून प्रथमेशवर गोळीबार केला होता. मात्र, सुदैवाने त्यावेळी कोणालाही दुखापत झाली नाही. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे. या खटल्यात प्रथमेशची साक्ष महत्वाची आहे. त्यामुळे प्रथमेशला शोधत मंदार आणि अभिषेक पत्त्याच्या क्लबमध्ये आले होते आणि आमच्या विरोधात तू साक्ष कशी देतो हेच पाहतो? असे बोलून आरोपींनी प्रथमेशवर वार केले आहेत.