विधिमंडाळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाला सोमवारपासून (1 मार्च 2021) सुरुवात झाली आहे. यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापलेले आहे. या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाची फैरी रंगली आहे. याचपार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटण्यासाठी विधान भवनात (Vidhan Bhavan) येणार होते. परंतु, ते उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच विधान भवनातून माघारी फिरले आहेत. सोशल मीडियावर याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्यामागचे नेमके कारण आता समोर आले आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असल्याने कोरोनाबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. यातच विधान भवनात येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह येणे गरजेचे आहे. त्यानंतरच संबंधित व्यक्तिला विधान भवनात प्रवेश दिला जात आहे. मात्र, राज ठाकरे यांनी ही चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आले नाही. ज्यामुळे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट होऊ शकली नाही. हे देखील वाचा- Maharashtra Assembly Budget Session 2021: कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दी टाळणे आणि मास्कचा वापर करणे हाच कोरोनापासून दूर राहण्याचा उत्तम उपाय असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मराठी भाषा दिनानिमित्त (27 फेब्रुवारी) मनसेने शाखा-शाखांवर मराठीतून स्वाक्षरी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यापैकी एका कार्यक्रमात स्वत: राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी मास्क लावला नव्हता. यासंदर्भात राज ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. यावर ते म्हणाले की, मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतो. राज ठाकरे यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली होती.