Maharashtra Assembly Budget Session 2021: कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Assembly Budget Session 2021) आजपासून सुरुवात झाली असून राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली. या अभिभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)  यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. यात 'कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे,' असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. माझे शासन कर्नाटक महाराष्ट्र विवाद बाबत सुप्रीम कोर्टात ठाम भूमिका मांडत आहे. मराठी भाषिक न्याय देण्यासाठी काम करत आहे, असं राज्यपाल म्हणाले.

राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात राज्यात कोरोनाविषयी केलेल्या उपाययोजना सांगितल्या. कोरोनासंदर्भातील आरोग्य उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. राज्य सरकारनं कोरोनासंदर्भात मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोरोना चाचणी साठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.हेदेखील वाचा- State Assembly Budget Session 2021: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येणाऱ्या 25 जणांना कोरोनाची लागण; पोलीस आणि पत्रकारांचा समावेश

यंदाचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10 मार्च असे दहा दिवस असणार आहे. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसंच लक्षवेधी होणार नाही.

कोरोना व्हायरसची स्थिती आणि कोरोना लसीकरणाची प्रक्रिया याबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच पूजा चव्हाण प्रकरण, वनमंत्री संजय राठोड यांसारख्या अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरतील.

दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची कोरोना चाचणी करण्यात येत होती. आतापर्यंत अधिवेशनासाठी 3200 जणांची कोव्हिड चाचणी करण्यात आली. यात 25 जण पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. यात एकाही आमदाराचा समावेश नाही. अनेक आमदारांनी स्वत:ची खासगी कोरोना चाचणी करून घेतली आहे. यात त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.