Maharashtra Legislative Assembly,Coronavirus | (Photo Credit : Youtube, Pixabay.com)

State Assembly Budget Session 2021: आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यात तब्बल 25 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यात पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या चाचणीत एकही आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. कोरोनाची लागण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये विधीमंडळ, मंत्रालय, पोलीस सुरक्षा दलातील कर्मचारी आणि दोन पत्रकारांचा समावेश आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची कोरोना चाचणी करण्यात येत होती. आतापर्यंत अधिवेशनासाठी 3200 जणांची कोव्हिड चाचणी करण्यात आली. यात 25 जण पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. यात एकाही आमदाराचा समावेश नाही. अनेक आमदारांनी स्वत:ची खासगी कोरोना चाचणी करून घेतली आहे. यात त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. (वाचा -Maharashtra Assembly Budget Session 2021: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 'या' मुद्यांवर होऊ शकते चर्चा)

दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सभागृहात आमदारांना बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सभागृहात आमदारांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

यंदा कोरोनामुळे विधीमंडळाचे अधिवेशन केवळ 10 दिवस चालणार आहे. अधिवेशनाच्या कमी कालावधीवरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. सरकारला चर्चेपासून पळ काढायचा आहे. त्यामुळे यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवण्यात आला, अशी खोचक टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.