Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रामध्ये ऋतू बदलतो आहे. हिवाळा संपूण आता उन्हाळा सुरु झाला. त्यामुळे राज्यातील तापमाण चढे राहू लागले आहे. हे तापमान आता कोणता उच्चांक गाठणार याबाबत चिंता असतानाच राज्यातील काही ठिकाणी पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये राज्याची राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये हवामान कोरडे राहील. आकाश निरभ्र राहील तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सियस आणि 23 अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, उर्वरीत राज्यातील काही ठिकाणी मात्र आभाळ येण्याची तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे.
मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस
हवामान विभागाने वर्तवलल्या अंदाजात पुढच्या पाच दिवसांसाठी तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा देतानाच पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणी पुढचे एक ते दोन दिवस सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. यातील काही ठिकाणी प्रति तास 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकतात, असेही आयएमडीने म्हटले आहे. (हेही वाचा, Summer and Health: उन्हाळा वाढतो आहे, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करायला हवे? घ्या जाणून)
तापमानात बदल नाही
दरम्यान, राज्यातील तापमानात मात्र पुढच्या 24 तासांमध्ये काही विशेष बदल होणार नाही. केवळ तुरळक भागात 3-4°C ने वाढ होईल. 20 ते 22 मार्च 2024 दरम्यान कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (हेही वाचा, Government Advisory For Summer Cooking: उन्हाळ्याच्या दिवसात आहाराच्या पथ्यपाण्यासोबतच जेवण बनवतानाही घ्या 'ही' काळजी!)
एक्स पोस्ट
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
आकाश मुख्यतः निरभ्र राहील.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४°C आणि २३°C च्या आसपास असेल. pic.twitter.com/ieDty8u3UW
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 19, 2024
राज्यामध्ये तापमान वाढलू लागले आहे. राज्यातील शहरी भागात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तर ग्रामिण महाराष्ट्रात पाण्याची टंचाईच काय, थेट दुष्काळसदृश्य स्थिती पाहायला मिळते आहे. अनेक ठिकाणी शेतीसाठी पाणी कमी पडू लागले आहे. जनावरांना चारा आणि आरोग्याचेही प्रश्न निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला नागरिकांनाही वाढत्या तापमानाचा त्रास जाणवू लागला आहे. उकाडा आणि उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी शाळाही सकाळच्या सत्रामध्ये सुरु केल्या आहेत. ऊन्हाच्या झळा वाढू लागल्याने नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळी कारण नसेल तर घराबाहेर पडणे टाळावे. घरातून बाहेर पडण्याची वेळ आलीच तर डोक्याला टोपी, डोळ्याला चष्मा, शक्य असेल तर छत्री वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे