Rains | | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मधल्या काळात काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस (Maharashtra Rain Update) पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी पुन्हा एकदा रिपरीप तर काही ठिकाणी मुसळधार बरसत आहे. प्रामुख्याने मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Rains) विशेष उपस्थिती दर्शवली आहे. राजधानी मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पाऊस चांगलाच बरसू लागला आहे. पुढचे चार दिवसही महत्त्वाचे ठरणार असून या काळातही काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र अशा दोन्ही ठिकाणी एकाच वेळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे. महाराष्ट्रातील पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने परिस्थितीचा आढावा घेणे सुरु केले आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या समाधानकारक पर्जन्यवृष्टी होत आहे. प्रामुख्याने औरंगाबाद, लातूर, नांदेड या मराठवाड्यांतील जिल्ह्यांस कोकणात (प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी ) सुद्धा पावसाने दमदार हजेरी लावली आहे.  (हेही वाचा, Maharashtra Rain Update: राज्यात 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता; काही जिल्ह्यांमध्ये होणार अतिवृष्टी)

दरम्यान, विदर्भात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, साधारण 7 ते 9 ऑगस्ट या काळात विदर्भात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. तर 10 ऑगस्ट रोजी सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. काही भागांमध्ये गावात पाणी शिरल्याने संपर्क तुटला आहे. आवश्यक त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. जेणे करुन जीवितहानी टाळली जाईल. त्यासाठी एनडीआरएफचे जवान आणि राज्याचे मतद आणि पुनर्वसन विभाग कामाला लागला आहे. स्थानिक नागरिकही आगोदरच्या अनुभवातून शाहणे होऊन धोका पत्करणे टाळत आहेत. काही ठिकाणी मात्र जुन्या चुकांची पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे.