Ashish Shelar (Pic Credit - ANI)

Ashish Shelar On Shivsena: भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची (BJP Mumbai President) जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात (BMC Election 2022) भाष्य केलं. आगामी निवडणुकीत मुंबई महानगर पालिकेत भाजपाचा महापौर असेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

दरम्यान, यावेळी आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत बदल होणार हे निश्चित आहे. मुंबई महानगर पालिकेत आमचाच महापौर असेल. मुंबईत भाजपाचं काम आणखी गतीने वाढवणार आहे. यावेळी मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीत निश्चित यश मिळवू, असा विश्वासही यावेळी आशिष शेलार यांनी व्यक्त केला. (हेही वाचा - Sameer Wankhede यांना Caste Scrutiny Committee चा दिलासा; समीर वानखेडे जन्मतः मुस्लिम नाहीत!)

शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना आशिष शेलार पुढे म्हणाले की, गेल्या तीन दशकात शिवसेनेने फक्त कंत्राटदारांना पोसण्याचं काम केलं आहे. शिवसेना नेते मुंबई शहरामध्ये दिरंगाई आणि घोळ यापासून स्वतःचे हात बाजूला ठेवू शकत नाहीत. निकृष्ट दर्जाचे कोस्टल रोडवरचे काम, मेट्रो कारशेडबाबतचा अहंकार, यातून मुंबईकरांच्या डोक्यावर मोठा भुर्दंड टाकला जात आहे, असा आरोपही यावेळी आशिष शेलार यांनी केला.

गेल्या 25 वर्षात तुम्ही तुमच्या मनामध्ये जे चित्र रंगवलं होतं ते साकारण्याचे काम भाजप करेल. यासाठी आम्हाला मुंबईकरांचे आशीर्वाद मिळतील. भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करायचं आहे आणि मुंबईकरांच्या मनातील स्वप्न प्रत्येकक्षात आणायचं आहे, अशी प्रतिक्रियाही आशिष शेलार यांनी दिली आहे.