Uday Samant | (Photo Credit - Twitter)

Uday Samant On Eknath Shinde: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या काही तास आधी शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सकारात्मक निर्णय घेतील, असं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर शिवसेनेत कोणीही मंत्रीपद घेणार नाही, अशी भूमिका उदय सामंत यांनी घेतली आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास असून त्यांच्याशिवाय आमच्या पक्षात उपमुख्यमंत्री होणार नाही, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणारे फडणवीस, दोन उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना सांगितले. मंत्रिमंडळातील इतर मंत्री नंतर शपथ घेणार आहेत. (हेही वाचा -Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरसावले, एकनाथ शिंदे रुसले? गिरिश महाजन भेटीसाठी वर्षा बंगल्यावर)

अजित पवार यांनी गुरुवारी शपथ घेणार असल्याचे सांगितले असले तरी शिंदे गटाकडून अद्याप उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याचे स्पष्ट झालेले नाही. इतर मंत्री मंत्रिपदाची शपथ कधी घेतील, असे विचारले असता मुनगंटीवार यांनी सांगितले की, प्रशासकीय विस्कळीतपणा टाळण्यासाठी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -Maharashtra CM Oath Taking Ceremony: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबई येथील आझाद मैदानावर सोहळा)

दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देतील. 20 नोव्हेंबरच्या राज्य विधानसभा निवडणुका पार पडल्या. तसेच 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर दोन आठवड्यांच्या तीव्र वाटाघाटीनंतर आज नवीन सरकारची स्थापना होणार आहे.