
पुणे (Pune) शहरात गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाई (Water Cuts) ही एक गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात पाण्याची मागणी वाढते, तर धरणांमधील पाण्याचा साठा कमी होत जातो. यामुळे पुणे महानगरपालिका (PMC) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) यांना पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागतो. सध्या, मे 2025 पासून पुण्यातील काही भागांमध्ये रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा बंद करण्याचे नियोजन सुरू आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा प्रामुख्याने खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधून होतो.
मे 2025 च्या सुरुवातीला पुणे महानगरपालिकेने घोषणा केली की, वडगाव जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या दक्षिण पुण्यातील काही भागांमध्ये 5 मे 2025 पासून साप्ताहिक पाणी कपात लागू होईल. यामध्ये धायरी, सनसिटी, वडगाव बुद्रुक, हिंगणे, सहकारनगर आणि इतर काही परिसरांचा समावेश आहे. ही कपात रोटेशन पद्धतीने होणार असून, प्रत्येक भागात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. पाणी कपातीचे कारण म्हणजे खडकवासला धरणातील पाण्याचा साठा अपेक्षेपेक्षा कमी असणे.
अशी असेल पाणी कपात-
सोमवार: बालाजीनगर, गुरुदत्त सोसायटी, कात्रज तलावाचा पूर्व भाग, कोंढवा, पवार हॉस्पिटल, कात्रज, उत्कर्ष सोसायटी, गुजरवस्ती, साईनगर, शांतीनगर, श्रीकृष्ण कॉलनी आदी.
मंगळवार: सनसिटी, जुनी धायरी, माणिक बाग, विठ्ठलवाडी, राजस सोसायटी, कमला सिटी, स्टेट बँक सोसायटी, कामठे पाटीलनगर, खडी मशिन चौक, सिंहगड कॉलेज, महालक्ष्मी सोसायटी, पेरुची बाग, हिंगणे, महादेवनगर, आनंदनगर आदी.
बुधवार: हिंगणे, वडगाव बुद्रुक, खरोड वस्ती, संतोष हॉल मागील भाग, आनंदनगर, वाघजाईनगर, सम्राट टॉवर, अंबामाता मंदिर परिसर, माऊलीनगर, बलकवडे नगर, सुखसागरनगर भाग 2, शिवशंभोनगर, तळजाई पठार, सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर आदी.
गुरुवार: धनकवडी गावठाण, राजमुद्रा सोसायटी, दौलतनगर, चैतन्यनगर, टिळकनगर, सावरकर सोसायटी, आंबेडकर वसाहत, सहकारनगर भाग 1. सुखसागर नगर भाग 1, महादेवनगर भाग 2, निलया सोसायटी, सावकाशनगर, काकडेवस्ती, गोकुळनगर आदी.
शुक्रवार: आंबेगाव पठार, दत्तनगर भुयारी मार्ग, त्रिमुर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठ मागील भाग, वसवडेनगर, जाधवनगर, भारतनगर, दत्तनगर, कोंढवा बुद्रुक गावठाण, वटेश्वर मंदीर, हिल व्ह्यू सोसायटी, मरळ नगर, ठोसरनगर आदी.
शनिवार: आगम मंदिर, संतोषनगर, जांभुळवाडी रस्ता, वंडर सिटी परिसर, साईनगर, राजीव गांधी वसाहत, चैत्रबन वसाहत, झांबरे वस्ती, अजमेरा पार्क, शिवशक्ती नगर आदी.
रविवार: महादेवनगर, आनंदनगर, विद्यानगर, महावीरनगर, पिसोळी रोड, पारगेनगर, आंबेडकरनगर, हगवणेनगर, पुण्यधाम आश्रम रोड.
जरी धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याचे सांगितले जात असले, तरी वाढत्या लोकसंख्येमुळे आणि पाण्याच्या अतिवापरामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय, पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठीही काही वेळा पाणी बंद ठेवावे लागते. पाणी कपात ही पुणेकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. विशेषतः दक्षिण पुण्यातील रहिवासी, ज्यांना आधीच कमी दाबाने पाणी मिळते, त्यांना या कपातीमुळे अधिक त्रास सहन करावा लागतो. अनेक कुटुंबांना पाणी साठवून ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. काही भागांमध्ये नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते, जे महागडे असतात आणि त्यांच्यावर टँकर माफियांचे नियंत्रण असते. (हेही वाचा: Weather Update: विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 4-5 मे रोजी पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी)
दरम्यान, पाणीटंचाईच्या या काळात नागरिकांनीही काही जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे, गळती तातडीने दुरुस्त करणे, आणि पाणी साठवण्याची योग्य व्यवस्था करणे ही पावले महत्त्वाची आहेत. याशिवाय, पाणी कपातीच्या वेळी खासगी टँकरवर अवलंबून राहण्याऐवजी सामुदायिक पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा. उदाहरणार्थ, सोसायट्यांमध्ये पाण्याचे टँकर मागवून त्याचे वाटप करणे हा एक पर्याय असू शकतो.