
विरार रेल्वे स्टेशन (Virar Railway Station) वर पतीनेच पत्नीवर जीवघेणा चाकू हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिव शर्मा आणि वीर शिला शर्मा असं या जोडप्याचं नाव आहे. कौटुंबिक वादामधून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. वीरशीला कामावर जात असताना पती शिव यांनी तिच्यावर हल्ला केला. विरारच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला लागून असलेल्या पादचारी पूलावर हा प्रकार घडला आहे. आज 3 जुलै सकाळी 7.30 च्या सुमाराची ही घटना आहे.
शिव यांनी पत्नी वीरशिलाला ब्रीजवर एकटं गाठून तिच्यावर चाकूने हल्ला केला. नंतर ओढणीने तिचा गळा आवळण्याचा देखील प्रयत्न केला. वीरशीलाने प्रसंगावधान दाखवत चाकू हातात धरला. मात्र यामध्ये तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. गळ्यावरही चाकूचा वार झाला आहे. यामध्ये तिचा जीव वाचला आहे.
वीरशिला वर सध्या विरारच्या संजीवनी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत तर पती शिव शर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे. पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होते. काल त्यावरून दोघे विरार पोलिस स्टेशनला गेले होते. पोलिसांनी त्यांना समजावून काल घरी पाठवले होते. त्यानंतर आज हा प्रकार घडला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी वसई मध्येही भररस्त्यात अशाच प्रकारने एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. रात्री उशीरा कामावरून परतणार्या 32 वर्षीय एका चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचा वसई रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरून, विनयभंग करण्यात आला होता.