congress | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Maharashtra Legislative Assembly Election 2019: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रीय काँग्रेस (Congress) पक्षाची पहिली यादी येत्या 6 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाराष्ट्र छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांच्या उपस्थितीत पक्षाची एक बैठक गुरुवारी (29 ऑगस्ट 2019) रोजी पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतल संभाव्य काँग्रेस उमेदवारांबाबत विधानसभा मतदारसंघनिहाय प्राथमिक चर्चा करण्यात आली. छाननी समितीची या नंतरची बैठक येत्या 5 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजप, शिवसेना हे सत्ताधारी पक्ष जनसंपर्क वाढविण्यासाठी महाजनादेश यात्रा, जन आशीर्वाद यात्रा आदींच्या माध्यमातून जनसंपर्क कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, पक्षाला लागलेली गळती विचारात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सावध पावले टाकत आहेत.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची आघाडी झाली असून हे दोन्ही पक्ष आपल्या मित्रपक्षांसोबत आगामी निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. या दोन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र नक्की झाले आहे. त्यानुसार दोन्ही पक्ष प्रत्येकी 106 मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत. म्हणजेच दोन्ही पक्ष मिळून 212 मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत. तर उर्वरीत 40 ते 42 मतदारसंघ हे मित्रपक्षांसाठी सोडणार आहेत. तर, इतक्या जागांचा प्रश्न निकाली निगाल्यानंतर उर्वरीत ज्या 44 ते 46 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्याबाबत लवकरच चर्चा करुन तोडगा काढण्यात येणार असल्याची माहितीही विजय वडेट्टीवार यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सहा सदस्यांची नावे जाहीर केली होती. या समितीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मल्लिाकार्जुन खरगे यांच्यासह इतर सहा नेत्यांचा समावेश होता. मात्र, या यादीत विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा मात्र समावेश नव्हता. मात्र, त्यांच्या वगळलेल्या नावावर पक्षादेश आला आणि वडेट्टीवार यांची वर्णी या सहा सदस्यांच्या यादीत लागली असे समजते.

दरम्यान, यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी होण्याची शक्यता आता फारच कमी झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, काँग्रेस सोबत आघाडी करण्यास वंचित बहुजन आघाडी म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांना काहीच स्वारस्य उरले नाही. त्यामुळेच ते वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या आघाडीचा विषय पुढे आला की वेगवेगळी कारणे पुढे करत असतात. कधी ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत नको म्हणतात, कधी मध्येच काँग्रेसला 40 जागा देतो म्हणून सांगतात. तर, कधी राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करतो म्हणतात. कधी ते प्रकाश आंबेडकर यांनाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करा असे म्हणतात. यावरुनच त्यांची वारंवार बदलणारी भूमिका पुढे येते, असे वडेट्टीवार म्हणाले. (हेही वाचा, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा राजकारणात प्रवेश; महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन प्रवक्तेपदी निवड)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला सोबत घेण्याबाबत फारसा उत्सुक नव्हता. पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांची भेट झाल्यानंतर पक्षाने मनसेबाबत लवचिक भूमिका घेतल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.