प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा राजकारणात प्रवेश; महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन प्रवक्तेपदी निवड
Singer Anand Shinde l (Photo Credits: Facebook)

आपल्या खास आवाजातील गाण्यांमुळे महाराष्ट्र आणि देशभरात आपला खास चाहता वर्ग निर्माण केलेले प्रसिद्ध गायक आनंद शिंदे (Singer Anand Shinde) यांनी थेट राजकारणात प्रवेश केला आहे. सोलापूर (Solapur) येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे यांनी ही माहिती दिली. आनंद शिंदे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष (Maharashtra Swabhiman Republican Party) राजकीय वाटचालीसाठी निवडला आहे. विशेष म्हणजे पक्ष प्रवेश होताच शिंदे यांची महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. आनंद शिंदे यांनी गायलेली 'माझा नवीन पोपट हा', 'तू लाख इबादत करले...', 'सुन मेरी अमिना दिदी', 'तुझा पोरगा डायवर हाय' ते ' तुझी चिमनी उडाली भूर्रर्र' आदी गीते, लोकगीते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गाणी विशेष प्रसिद्ध आहेत.

शिंदे यांच्या राजकारण प्रवेशाची वेळ पाहता ते आगामी विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. काही राजकीय विश्लेषक, शिंदे समर्थक आणि प्रसारमाध्यमांनी ते कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात याबाबत अंदाजही वर्तवले आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आनंद शिंदे हे सोलापूर जिल्हातील विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघ आणि सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ हे राखीव आहेत. या राखीव मतदारसंघातूनच शिंदे हे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, आनंद शिंदे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्राचे सुपरहीट गायक डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी शिवसेना आणि नेत्यांनी जोर लावला होता. तसेच, दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही  शिंदे पिता-पुत्राला विधानसभेची ऑफर दिली होती. त्याबाबत एक बैठकही पार पडली होती. मात्र, शिंदे पिता-पुत्रांनी त्यास नकार दिला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान, या शिंदे पिता पूत्रांना शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि एमआयएम आदी पक्षांनीही आपल्या गोटात घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, शिंदे यांनी सर्वांनाच चकवा देत महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष हा 2012 मध्ये स्थापन झाला. मनोज संसारे हे या पक्षाचे संस्थापक आहेत. दरम्यान, या पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी यापूर्वी सुषमा अंधारे या सांभाळत होत्या. आता ती शिंदे यांच्याकडे आली आहे.

दरम्यान, अद्याप आम्ही कोणत्या मतदारसंघावर लढायचे याबाबत विचार केला नाही. पण, पक्षबांधणीसाठी आपण महाराष्ट्रभर फिरु असे, शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच, भाजप-शिवसेना युतीला रोखणे हिच आमची भुमीका असल्याचे शिंदे यांनी या वेळी सांगितले. विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे सुतोवाचही शिंदे यांनी या वेळी केले.