Unseasonal Rain Updates: चंद्रपूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट (Watch Video)
Unseasonal Rain | (Photo Credits: X)

Garpit With Unseasonal Rain: एका बाजूला वाढते तापमान, कडक उन्हाळा आणि उन्हाच्या झळा आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस, गारपीट अशा विचित्र कात्रीत राज्यातील शेतकरी अडकला आहे. राज्याच्या विविध भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. खास करुन चंद्रपूर (Chandrapur), यवतमाळ, गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळला. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याचेही पाहायला मिळाले. गारांचा आकारही मोठा असल्याने परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण होते. अवकाळी पावसामुळे वातावरणातील गर्मी काहीशी कमी झाली असली तरी, गारांनी मात्र नुकसान केले आहे.

दुपारी 2 च्या सुमारास वातावरणात बदल

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मंगळवारी (7 मे) सकाळपासून वातावरण कोरडे होते. कडक उन्हामुळे वातावरणातील उष्मा अधिच वाढला आणि तापमानही चढे राहिले. पारा जवळपास 44 अंशाच्याही वर गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास वातावरणात बदल होऊ लागला. पुढच्याकाहीच मिनिटांमध्ये आकाशात ढगांचा कडकडाट सुरु झाला आणि विजाही चमकू लागल्या. पुढच्या काहीच क्षणामध्ये गारपीट आणि मुसळधार अवकाळी पावसास सुरुवात झाली. धक्कादायक म्हणजे वरोरा तालुक्यात काही ठिकाणी गारांचा आकार लिंबाएवढा होता. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गारपीटीचा शेतपिकालाही चांगालच फटका बसला. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: पुढील 4-5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज)

पाठिमागील चार दिवसांतील चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान

शनिवार- 43 अंश सेल्सिअस

रविवार- 44.2 अंश सेल्सिअस

सोमवार- 46.6 अंश सेल्सिअस

मंगळवार- 44 अंश सेल्सिअस

व्हिडिओ

दुपारी दोनपर्यंत अशरश: कोरडेठाक असलेले वातावरण आणि निरभ्र आकाश अचानक आपला नूर पालटू लागले. दुपारनंतर आकाशात ढग जमू लागले, आभाळ भरुन यायला लागले. काळोखी साचलेल्या आभाळातून पावसाचे थेंब टपकू लागले आणि सोबतच गारीपीटही सुरु झाली. ज्यामुळे सामान्यांची त्रेधातिरपीट उडाली. कोरड्याठाक पडलेले ओढे, नाले अचानक आलेल्या पावसाने तुडुंब भरुन वाहायला लागले. रस्त्यांवरही पाणी साचले.

व्हिडिओ

वातावरणातील दाह कमी

अचानक आलेल्या पावसासोबत झालेल्या गारपीटीने शेतमालाचे नुकसान केले असले तरी वातावरणातील दाह मात्र कमी केला आहे. त्यामुळे परिसरात थंडावा पसरला असून उकाड्याने नागरिकांची होणारी घालमेल कमी झाली आहे. उष्णतेपासूनही दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल अशी बळीराजाची आणि पशुपालकांची इच्छ आहे. प्रत्यक्षात मात्र, हा पाऊस जमीनीतील दाह किती कमी करतो आणि जनावरांचा चारा किती फुलतो हे आगामी काळातच कळणार आहे. तुर्तास तरी शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. या पावसाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल जाले आहेत.