पाऊस (संग्रहित छायाचित्र)

राज्यावर सध्या कोरोनाचे संकट घोंगावत असताना शनिवारी राजगड (Raigad) जिल्ह्यात अवकाळी पावसाने ( Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. अचानकपणे आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडविली आहे. काही ठिकाणी झालेल्या गारपीटीमुळे आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून अवेळी येणाऱ्या पावसाचा सामना करावा लागत आहे. मागील आठवड्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले होते. त्या संकटातून बाहेप पडत असताना पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. यात बऱ्याच ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाल्याने फळबागांना फटका बसला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. कोकणात आंबा हंगामाची सुरुवात झाली आहे. कोकणातील शेतकरी आता आंबा विक्रीसाठी तयार आहे. मात्र, खरेदीसाठी व्यापारी आणि ग्राहकच मिळत नसल्याचे बागायदारांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने आंब्याच्या वितरण आणि विक्रीसाठी व्यवस्था करावी अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात आली होती. जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, सुधागड, माणगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर महाड पोलादपुर परिसरातही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. म्हसळा परिसरात पावसासोबत गारपीटही झाली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसामुळे आंबा आणि काजू पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- नियम आणि शिस्तीचे पालन न केल्यास 30 एप्रिलनंतरही महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे संकट वावरत असताना डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवत आहेत. दरम्यान, नागरिकांना भाजीपाला पुरवण्यासाठी आता शेतकरी वर्गही मोठे योगदान देत आहेत. मात्र, अवकाळी पावसामुळे याच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहेत.