Ujjwal Nikam

Ujjwal Nikam Resignation: मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावरून लोकसभा निवडणूक लढवणारे उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी सरकारी वकील म्हणून राजीनामा दिला आहे. निकम यांनी राज्यभरातील 29 प्रलंबित खटल्यांमधील विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. राज्य सरकारने निकम यांना संपूर्ण महाराष्ट्रातून ही 29 प्रकरणे सोपवली होती. आता त्यांनी या सर्व प्रकरणांमध्ये राजीनामा दिला आहे. यामध्ये 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यासह मुंबईतील आठ प्रकरणांचा समावेश आहे.

निकम यांनी गेल्या शनिवारी भाजपकडून त्यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्याच्या एक दिवस आधी राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडे राजीनामा पाठवल्याचे समजते. विभागाने त्यांचा राजीनामा स्वीकारला असून या 29 प्रकरणांमध्ये त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे. या खटल्यांमध्ये आता इतर सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गुरुवारी मुंबईतील एका न्यायालयात निकम यांच्या राजीनाम्याची माहिती देण्यात आली.

दिल्लीस्थित व्यापारी अरुणकुमार टिक्कू आणि चित्रपट निर्माता करण कक्कड यांच्या कथित हत्येप्रकरणी विजय पालांडे आणि इतरांविरुद्ध खटला हा 2012 पासून प्रलंबित आहे. यामध्ये नवीन अभियोक्ता नियुक्त केला जाईल, अशी माहिती मुख्य सरकारी वकील जयसिंग देसाई यांनी न्यायालयाला दिली. निकम हाताळत असलेल्या महत्वाच्या खटल्यांमध्ये, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदालचा खटला, अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांच्या कथित हत्येप्रकरणी परवेझ टाक याच्याविरुद्ध खटला, मलबार हिल येथे 2003 मध्ये प्रसूतीतज्ज्ञ आशा गोयल यांची हत्या झालेला खटला यांचा समावेश होतो. (हेही वाचा: Extortion Case: मनसे नेते Avinash Jadhav यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; सोने व्यापाऱ्याकडे मागितली 5 कोटींची खंडणी)

निकम यांची गेल्या तीन दशकात अनेक खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता ते भाजपकडून उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, जिथे पूनम महाजन या भाजपच्या दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. निकम शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.