Extortion Case: मनसे नेते Avinash Jadhav यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; सोने व्यापाऱ्याकडे मागितली 5 कोटींची खंडणी
Avinash Jadhav | FB

Extortion Case: लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला आपला पाठींबा जाहीर केला आहे. मनसे राज्यात आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहवालानुसार, लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध 5 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एलटी मार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मरीन ड्राईव्ह येथे राहणारे आणि सोन्याचा व्यवसाय करणारे फिर्यादी शैलेश कांतीलाल जैन (55) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे की, ते फेब्रुवारी 2024 पासून वैभव ठक्कर नावाच्या व्यक्तीसोबत व्यवसायात सामील होते. बुधवारी त्यांनी वैभव ठक्कर याला खाते सेटल करण्यासाठी आपल्या दागिन्यांच्या दुकानात बोलावले होते. त्यावेळी वैभवसोबत मनसे नेते अविनाश जाधव आणि त्यांचा चालक, त्यांच्या अंगरक्षकासह इतर पाच-सहा जणांनी जबरदस्तीने जैन यांच्या दुकानात प्रवेश केला.

जैन यांनी आपल्या तक्रारीमध्ये पुढे म्हटले आहे, जाधव यांनी दुकानात घुसून आपल्या मुलाला मारहाण केली. तसेच त्यांनी मुलाला घेऊन जाण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. जैन यांच्या कार्यालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याची बाब एका पोलीस अधिकाऱ्याने उघड केली आहे. (हेही वाचा: Child Trafficking Racket Busted: लहान मुलांच्या तस्करी प्रकरणी 4 महिलांना अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई)

या प्रकरणी पोलिसांनी शैलेश कांतीलाल जैन यांच्या तक्रारीच्या आधारे, कलम 385 (व्यक्तीला दुखापतीची भीती दाखवून खंडणी वसूल करणे), 143 (बेकायदेशीरपणे एकत्र येणे), 147 (दंगलीचा गुन्हा करणे), 323  (स्वच्छेने दुखापत करणे) आणि 120 ब (गुन्हेगारी) अन्वये एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी वैभव ठक्कर आणि अविनाश जाधव यांच्यावर हे गुन्हे दाखल केले आहेत. अविनाश जाधव हे मनसेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष आहेत. याआधी टोलप्रश्नी मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी जाधव यांना अटक केली होती.