महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील गटाने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्रही लिहिले आहे. 12 मुद्द्यांच्या या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटाच्या बाजूने पक्षपात झाला आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याबाबत निवडणूक आयोगाने भेदभाव केला असल्याचे असे उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
नुकतेच निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाला नवीन पक्ष नावे आणि चिन्हांचे वाटप केले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाने सुचवलेली चिन्हे आणि नावे शिंदे गटाने निवडल्याचे उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच ठाकरे गटाने दिलेल्या सूचनांमुळे शिंदे गटाला कॉपी करण्याची संधी मिळाली व याला निवडणूक आयोग जबाबदार आहे, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने ठाकरे यांच्या निवडीची नावे आणि चिन्हे निवडणूक मंडळाच्या वेबसाइटवर अपलोड केली होती, त्याचा फायदा शिंदे गटाने घेतला. मात्र शिंदे गटाची नावे व चिन्हे अपलोड केली गेली नाहीत. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवण्यासाठी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला 'ज्वलंत मशाल' हे निवडणूक चिन्ह दिले होते. याशिवाय त्यांना पक्षासाठी 'शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाला 'तलवार-ढाल’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले असून, 'बाळासाहेबांची शिवसेना' असे पक्षाचे नाव आहे. (हेही वाचा: 'शिवसेना सोडली नसती तर..', छगन भुजबळ यांच्या वाढदिनी उद्धव ठाकरे यांची तुफान फटकेबाजी)
शिवसेनेच्या नावावर आणि चिन्हावर कोणाचा अधिकार असेल, या संदर्भात निवडणूक आयोगाच्या अंतरिम निर्णयानुसार ठाकरे आणि शिंदे गटाला पक्षाची पर्यायी नावे आणि चिन्हे दिली आहेत. त्यासाठी आयोगाने दोन्ही गटांकडून सूचना मागवल्या होत्या. आता ठाकरे गटाचा आरोप आहे की, निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे त्यांनी सुचवलेले पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाने निवडले आहे.